लडाख – जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चीनच्या लढाऊ विमानांनी लडाखच्या हवाई हद्दीजवळून उड्डाण केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. पहाटे 4च्या सुमारास चीनच्या लढाऊ विमानाने ही चिथावणीवखोर कारवाई केली. मात्र सतर्क असलेल्या भारतीय वायुसेनेने याच्या विरोधात त्वरित हालचाली सुरू केल्या. भारतीय वायुसेनेच्या सज्जतेची चाचणी घेण्यासाठी तसेच लडाखच्या एलएसीवर दडपण वाढविण्यासाठी चीनने ही कारवाई केल्याचे दिसत आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून चीन भारताबरोरील राजनैतिक पातळीवरील सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहे. भारत सरकारने चीनच्या व्यापारी हितसंबंधांना हादरे देणारे निर्णय घेण्याचा सपाट लावला आहे. या पार्श्वभूमीवर आर्थिक व राजनैतिक पातळीवरील सहकार्य नव्याने प्रस्थापित करून चीन आपले नुकसान टाळण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र त्यासाठी भारताची मागणी मान्य करून लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी आपले लष्कर माघारी घ्यायला चीन तयार नाही. तर एलएसीवर सैनिक तैनात असताना, दोन्ही देशांमधील संबंध पूर्ववत होणे शक्य नसल्याचे भारताने चीनला बजावले आहे.
या पार्श्वभूमीवर, लडाखच्या एलएसीवरील तणाव अधिक वाढू शकतो, असा संदेश चीन भारताला देऊ पाहत आहे. त्यासाठी लडाखच्या एलएसीजवळील तिबेटच्या क्षेत्रात चीनने लढाऊ विमानांची व हवाई सुरक्षा यंत्रणेची तैनाती वाढविली आहे. भारताने याची दखलघेतली असली, तरी चीनच्या या तैनातीचे दडपण भारतावर आलेले नाही. कारण या क्षेत्रात भारतीय वायुसेनेची ताकद चीनपेक्षा खूपच अधिक असून संघर्षाची वेळ आलीच, तर भारतीय वायुसेना चीनवर सहजपणे मात करू शकेल, असे आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या विश्लेषकांनी याआधीच बजावले होते.
तरीही चीन आपल्या लढाऊ विमानांच्या हालचालींद्वारे भारतावर दडपण टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते. जून महिन्याच्या अखेरीस चीनच्या लढाऊ विमानाने लडाखच्या हवाई क्षेत्राजवळून उड्डाण करून भारतीय वायुसेनेच्या सज्जतेची चाचपणी केली. मात्र वायुसेनेने त्वरित याच्या प्रत्युत्तरादाखल आवश्यक ती कारवाई करून चीनला योग्य तो इशारा दिलेला आहे. पुढच्या काळातही चीनने अशा स्वरुपाचे प्रयत्न केले, तर त्याला वायुसेनेकडून अधिक आक्रमक प्रत्युत्तर मिळू शकेल.