कोलंबो – अन्नधान्य, इंधन आणि इतर जीवनावश्यक गोष्टीच्या टंचाईचा सामना करीत असलेल्या श्रीलंकन जनतेच्या असंतोषाचाउद्रेक झाला आहे. हजारो निदर्शकांनी राजधानी कोलंबोमधील राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थावर धडक मारून याचा ताबा घेतला. मात्र याच्या आधीच राष्ट्रपती राजपक्षे या ठिकाणाहून अज्ञात स्थळी पोहोचले होते. पोलीस तसेच श्रीलंकन लष्करालाही या संतप्त जमावावर नियंत्रण मिळविणे अतिशय अवघड गेले. जनतेच्या असंतोषाचा हा भडका उडालेला असताना, पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी राजीनामा देऊन सर्वपक्षीय सरकारच्या स्थापनेचा प्रस्ताव दिला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून श्रीलंका अन्नधान्य व इंधनाच्या टंचाईचा सामना करीत आहे. अन्नधान्य व इंधनासहइतर जीवनावश्य गोष्टींच्या खरेदीसाठी श्रीलंकेकड परकीय गंगाजळी उरलेली नाही. भयंकर आर्थिक संकटाला तोंड देत असताना, ही टंचाई श्रीलंकेत भयंकर स्वरूप धारण करत आहे. टंचाईमुळे झालेली दरवाढ श्रीलंकन जनतेच्या संतापात भर टाकत आहे. त्यामुळे श्रीलंकन जनता वारंवार रस्त्यावर उतरून आपला निषेध व्यक्त करीत आहे. मात्र शनिवारी श्रीलंकन जनतेच्या संतापाचा भडका उडाला. निदर्शकांनी थेट राष्ट्रपतींच्या अधिकृत निवासस्थानी धडक मारली. श्रीलंकेत बराच काळराजपक्षे यांच्या परिवाराची सत्ता होती व या परिवाराच्या धोरणांनीच देशाची दैना उडविल्याचा आरोप होत आहे. त्यांच्यामुळेच श्रीलंकेवर आर्थिक संकट कोसळले असून अन्नधान्यापासून ते इंधनाच्या टंचाईला देखील राजपक्षे यांची चुकीची धोरणे व गैरव्यवहार कारणीभूत असल्याचे दावे श्रीलंकेचे इतर राजकीय पक्ष करीत आहेत. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रपती राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. तरीही सध्या राष्ट्रपतीपदावर असलेले गोटाबाया राजपक्षे राजीनामा द्यायला तयार नाहीत. यामुळे शनिवारी निदर्शकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानी धडक मारली होती.
मात्र निदर्शक इथे दाखल होण्याच्याही आधी राष्ट्रपती राजपक्षे यांनी अधिकृत निवासस्थान सोडले होते. यामुळे अनर्थ टळला. मात्र राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाचा ताबा घेणाऱ्या निदर्शकांचा या ठिकाणी बराच काळ मुक्त संचार सुरू होता. काही काळाने या ठिकाणाचा ताबा लष्कराने घेतला, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगविण्यात आले व त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. या कारवाईत 30 जण जखमी झाल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, श्रीलंकेचे सध्याचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून यात आपल्या राजीनाम्याचा प्रस्ताव दिला. सध्याची भयंकर परिस्थिती लक्षात घेता, श्रीलंकेत सर्वच पक्षांनी मिळून संयुक्त सरकार स्थापन करावे, असे आवाहन विक्रमसिंघे यांनी केले. त्यासाठी आपण राजीनामा द्यायला तयार असल्याचे पंतप्रधान विक्रमसिंघे म्हणाले. राजपक्षे परिवाराच्या गैरव्यवहार व चुकीच्या धोरणांबरोबरच श्रीलंकेतील राजकीय विसंवाद हे देखील या देशात माजलेल्या अस्थैर्याचे प्रमुख कारण ठरते.
श्रीलंकन जनतेचा पाठिंबा असलेले सरकार प्रस्थापित झाल्याखेरीज या देशाला स्थैर्य मिळणार नाही. मात्र त्यासाठी निवडणूक घेण्यासारखी परिस्थिती श्रीलंकेत नाही. म्हणूनच पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी सर्वपक्षीय सरकारचा प्रस्ताव दिला. पुढच्या काळात या देशातील परिस्थिती रूळावर आणायची असेल तर त्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्था तसेच प्रमुख देशांबरोबर वाटाघाटी करून मार्ग काढावा लागेल. यासाठी श्रीलंकेला जबाबदार राजकीय नेतृत्त्वाची आवश्यकता आहे. पण अन्नधान्य, इंधन आणि जीवनावश्यक गोष्टींच्या टंचाईने ग्रासलेल्या जनतेला दिलासा मिळाल्याखेरीज, या देशातील अराजक नियंत्रणात येणार नाही, हे वास्तव देखील शनिवारच्या निदर्शनामुळे जगासमोर आलेले आहे.