तालिबानने 935 कैद्यांची सुटका केली

काबुल – आंतरराष्ट्रीय समुदायाने अफगाणिस्तानातील आपल्या राजवटीला मान्यता द्यावी, यासाठी तालिबान धडपडत आहे. याचाच एक भाग म्हणून तालिबाननने 935 कैद्यांना माफी देऊन त्यांची सुटका केली. इस्लामधर्मियांच्या पवित्र सणाच्या निमित्ताने तालिबानने हा निर्णय घेतल्याचा दावा केला जातो. पण तालिबानच्या या निर्णयावर पाकिस्तानात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कारण या सुटका होत असलेल्या या कैद्यांमध्ये पाकिस्तानातील बलोच बंडखोरांचाही समावेश आहे.

taliban-prisoners-releaseगेल्या काही दिवसांपासून तालिबानचा सर्वोच्च नेता हैबतुल्ला अखुंदझदा अफगाणिस्तानातील राजवटीत अधिकाधिक कार्यक्षम झाला आहे. गेल्याच आठवड्यात राजधानी काबुलमध्ये आयोजित धार्मिक नेत्यांच्या बैठकीत अखुंदझदा सहभागी झाला होता. या बैठकीच्या निमित्ताने अखुंदझदाने आंतरराष्ट्रीय समुदायाकडे तालिबानच्या राजवटीला मान्यता देण्याचे आवाहन केले. तसेच अमेरिकेने अफगाणींचा निधी मोकळा करण्याची मागणी केली. तर दोन दिवसांपूर्वी अखुंदझदा याने 935 कैद्यांची सुटका करण्याचे आदेश दिले.

अफगाणिस्तानच्या जवळपास 34 प्रांतातील कारागृहातून या कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. यामध्ये राजधानी काबुलसह कंदहार, हेल्मंड, खोस्त या प्रांतातील कैद्यांचा समावेश आहे. कंदहारमधील कारागृहातून 400 हून अधिक जणांची सुटका करण्यात आली. यामध्ये 45 गंभीर गुन्हेगारांचा समावेश असल्याचे कंदहार कारागृहाच्या कमांडरचे म्हणणे आहे. तर अमली पदार्थाच्या सेवनाखाली अटक झालेल्या 140 जणांनाही सोडून देण्यात आले.

taliban-akhundzadaदरवर्षी अफगाणिस्तानच्या सरकारकडून काहीशे कैद्यांना शिक्षेतून माफी दिली जाते. पण यावर्षी तालिबानच्या राजवटीने हा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानचा शेजारी असलेल्या पाकिस्तानातून तालिबानच्या या निर्णयावर तीव्र चिंता व्यक्त होत आहे. कंदहारमधील कारागृहातून सुटका झालेल्या कैद्यांमध्ये 78 बलोच बंडखोर व त्यांचे वरिष्ठ कमांडर असल्याचा दावा पाकिस्तानी यंत्रणा करीत आहेत. या बलोच बंडखोरांची सुटका करून तालिबानने पाकिस्तानच्या चिंतेत भर टाकल्याची टीका पाकिस्तानची माध्यमे करीत आहेत.

पाकिस्तानच्या स्थापनेपासून बलोचिस्तानचा वाद सुरू आहे. पाकिस्तानने आमच्या प्रांताचा अवैधरित्या ताबा घेतल्याचा आरोप बलोच नेते, बंडखोर व येथील जनता करीत आहे. बलोच नेते व बंडखोर स्वतंत्र बलोचिस्तानची मागणी करीत आहेत. यापैकी बलोच बंडखोरांच्या संघटनांनी पाकिस्तानी लष्कर तसेच चिनी कर्मचाऱ्यांवर हल्ले चढवून संघर्ष पुकारला आहे. अशा या बलोच बंडखोरांची सुटका करून तालिबानने पाकिस्तानच्या सुरक्षेेला आव्हान दिल्याचा आरोप पाकिस्तानातील काही पत्रकार करीत आहेत.

गेल्या वर्षीही तालिबानने काबुलमध्ये राजवट प्रस्थापित केल्यानंतर काबुल आणि बागराम हवाईतळावर कैद असणाऱ्या आपल्या साथीदारांची सुटका केली होती. यामध्ये ‘तेहरिक-ए-तालिबान’च्या खतरनाक दहशतवाद्यांचा समावेश होता. हेच दहशतवादी गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानात हिंसाचार माजवित असल्याचा दावा पाकिस्तानी पत्रकार करीत आहेत. अशा परिस्थितीत बलोच बंडखोरांच्या सुटकेवर पाकिस्तान चिंता व्यक्त करीत आहे.

leave a reply