तेहरान – ‘अमेरिका-इस्रायलचा आखाती देशांबरोबरील हवाई सुरक्षा करार, या क्षेत्रात सुरक्षा आणि स्थैर्य प्रस्थापित होणार नाहीच. उलट या करारामुळे अधिक तणाव वाढून अविश्वास वाढेल. इराण या कराराकडे राष्ट्रीय व क्षेत्रिय सुरक्षेला असलेला धोका म्हणूनच पाहत आहे’, असा इशारा इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन येत्या काही दिवसात इस्रायलच्या दौऱ्यावर येणार असून त्याच्या आधी इराणने दिलेल्या इशाऱ्याचे महत्त्व वाढले आहे. तर इस्रायल-अमेरिका व अरब देशांमधील संयुक्त हवाई सुरक्षेच्या प्रस्तावावर फार आधीच काम सुरू झालेले आहे, असे इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी म्हटले आहे.
इस्रायल, अमेरिका, संयुक्त अरब अमिरात (युएई), बाहरिन, मोरोक्को, इजिप्त या देशांच्या नेगेव्ह परिषदेत संयुक्त हवाई सुरक्षा यंत्रणेचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. इराणची संरक्षणविषयक क्षमता वाढल्याने, त्यापासून निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन नेगेव्ह परिषदेत ‘मिडल ईस्ट एअर डिफेन्स-एमईएडी’ वर एकमत झाले होते. सध्या सौदी अरेबिया व इतर काही आखाती देश यामध्ये सहभागी झालेले नसले, तरी लवकरच हे देश देखील ‘एमईएडी’मध्ये सामील होतील, असा दावा केला जातो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचा इस्रायल दौरा यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकेल.
याची गंभीर दखल इराणने घेतली आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नासेर कनानी यांनी यासंदर्भात इराणला वाटत असलेली चिंता परखड शब्दात मांडली. दुसऱ्या देशांचा आखाती क्षेत्रातील शिरकाव ही धोकादायक बाब ठरते. या क्षेत्रात शस्त्रास्त्रांचे साठे रचून इथे सुरक्षा व स्थैर्य प्रस्थापित होऊ शकणार नाही. उलट यामुळे प्रचंड प्रमाणात तणाव निर्माण होईल व अविश्वासात नवी भर पडेल, असे कनानी यांनी म्हटले आहे. त्याचवेळी इराण एमईएडीकडे आपल्या व या क्षेत्राच्या राष्ट्रीय सुरक्षेला असलेला धोका म्हणूनच पाहत असल्याचे सांगून कनानी यांनी यात सहभागी होणाऱ्या देशांना बजावले आहे.
पर्शियन आखातासह आखाती क्षेत्रातील अमेरिका व इस्रायलच्या कारवाया धोकदायक आहेत. म्हणूनच या क्षेत्रातील देशांनी अमेरिका व इस्रायलला सहकार्य करू नये, अशी मागणी करून इराण या क्षेत्रातील देशांना त्यावरून धमक्या देत आहे. तर सिरिया, इराक, लेबेनॉन आणि येमेन या देशांवर इराणचा प्रचंड प्रमाणात प्रभाव वाढला असून त्यामुळे आपली सुरक्षा धोक्यात आल्याचे आखाती देशांचे म्हणणे आहे. येमेनमधील हौथी बंडखोरांनी सौदी व युएईवर चढविलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, या धोक्याची तीव्रता अधिकच वाढल्याचे आखाती देशांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात पा पडलेल्या नेगेव्ह परिषदेत एमईएडीवर चर्चा झाली. यावर इस्रायलचे काम सुरू देखीलझालेले आहे, अशी माहिती देऊन इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी इराणच्या चिंतेत नवी भर घातली. अमेरिकेचे नेते तसेच संरक्षण मुख्यालयाशी यावर आपल्या वाटाघाट पार पडलेल्या आहेत, असे सांगून संरक्षणमंत्री गांत्झ यांनी लवकरच एमईएडी सक्रिय होईल, असे म्हटले आहे. त्यामुळे इराणने कितीही आक्षेप नोंदविले व धमक्या दिल्या, तरी त्याने एमईएडीच्या प्रगतीवर काहीही परिणाम होणार नाही, ही बाब इस्रायलचे संरक्षणमंत्री लक्षात आणून देत आहेत.