नासा मंगळावरून रॉकेट प्रक्षेपित करणार

NASAवॉशिंग्टन – अमेरिकेतील आघाडीची अंतराळसंस्था ‘नासा’ने मंगळावरून रॉकेट प्रक्षेपित करण्याची घोषणा केली. नासाच्या ‘मार्स सॅम्पल रिटर्न प्रोग्राम’ अंतर्गत रॉकेट प्रक्षेपित करण्यात येईल, असे नासाने जाहीर केले. हे रॉकेट व संबंधित यंत्रणा विकसित करण्याचे कंत्राट अमेरिकेच्या ‘लॉकहीड मार्टिन स्पेस सिस्टिम्स’ या कंपनीला देण्यात आले आहे. ही मोहीम यशस्वी ठरल्यास मंगळावरून रॉकेट प्रक्षेपण करणारी नासा ही पहिलीच अंतराळसंस्था ठरेल.

काही वर्षांपूर्वी नासाने मंगळावरील वातावरण व भूपृष्ठाचा अभ्यास करण्यासाठी ‘पर्सिव्हरन्स’ नावाचे रोव्हर पाठविले होते. या रोव्हरकडून जमा करण्यात येणारे नमुने पृथ्वीवर परत आणण्यासाठी नासाने ‘युरोपियन स्पेस एजन्सी’च्या सहाय्याने संयुक्त मोहीम आखली आहे. या मोहिमेनुसार, नासा 2026 साली ‘सॅम्पल रिट्रायव्हर लॅण्डर’ प्रक्षेपित करणार आहे. या लॅण्डरमध्ये ‘मार्स ॲसेंट व्हेइकल’ (एमएव्ही) नावाच्या रॉकेटचाही समावेश असेल.

lockheed-martin-logoहे रॉकेट 10 फूट उंच व दीड फूट रुंद असणार आहे. टू स्टेज सॉलिड प्रॉपेलंटचा वापर असणारे हे रॉकेट उडविण्यासाठी ‘व्हेक्टर’ तंत्राचा वापर करण्यात येईल, अशी माहिती ‘लॉकहीड मार्टिन स्पेस सिस्टिम्स’ने दिली आहे. ‘सॅम्पल रिट्रायव्हर लॅण्डर’चाच वापर रॉकेटसाठी लाँचपॅड म्हणून करण्यात येणार आहे. रॉकेट मंगळाच्या कक्षेत उडविल्यानंतर त्यातील नमुन्यांचा समावेश असलेला कंटेनर कक्षेतील ‘युरोपियन स्पेस एजन्सी’च्या अंतराळयानाशी जोडला जाईल, अशी माहिती नासाकडून देण्यात आली.

2033 सालापर्यंत मंगळवरील नमुने पृथ्वीवर माघारी येतील, असा दावा नासाकडून करण्यात आला. मोहीम यशस्वी झाल्यास मंगळ ग्रहावरून रॉकेटचे प्रक्षेपण करणारी नासा ही जगातील पहिली अंतराळसंस्था ठरेल. मंगळावर अंतराळवीर पाठविण्याच्या मोहिमेसाठी हा टप्पा महत्त्वाचा ठरेल, असे नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांनी सांगितले.

leave a reply