अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे आदेश धुडकावून टेक्सास राज्याच्या गव्हर्नरांची निर्वासितांवर कठोर कारवाई

बायडेन यांचे आदेश धुडकावूनटेक्सास – अमेरिका-मेक्सिको सीमेवरील टेक्सास प्रांताचे गव्हर्नर ग्रेग ॲबॉट यांनी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचे आदेश धुडकावून निर्वासितांवर थेट कारवाई सुरू केली आहे. गव्हर्नर ग्रेग ॲबॉट यांनी यासंदर्भात आदेश जारी केले असून टेक्सास नॅशनल गार्ड व सुरक्षादलांना कारवाईचे अधिकार दिले आहेत. ॲबॉट यांच्या कारवाईवर उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी टीकास्त्र सोडले. टेक्सासचे गव्हर्नर आग भडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप हॅरिस यांनी केला. मात्र ॲबॉट यांनी आपल्या कारवाईवर ठाम राहण्याचे संकेत दिले असून या मुद्यावरून अमेरिकेतील राजकीय संघर्ष पेटण्याचे संकेत मिळत आहेत.

बायडेन यांचे आदेश धुडकावूनबायडेन यांनी सत्तेची सूत्रे स्वीकारल्यापासून अमेरिकेत सातत्याने अवैध निर्वासितांचे लोंढे धडकत आहेत. यातील लाखो अवैध निर्वासितांना बायडेन प्रशासनाने अमेरिकेत मोकळे सोडल्याचेही उघड झाले होते. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी निर्वासितांना मोकळीक देणारे धोरण स्वीकारल्याने अमेरिका-मेक्सिको सीमेवर असलेल्या टेक्सास व फ्लोरिडा यासारख्या प्रांतांमध्ये आणीबाणीची परिस्थितीही निर्माण झाली आहे. याविरोधात सातत्याने आवाज उठविल्यानंतरही बायडेन यांनी पावले उचललेली नाहीत. उलट त्यांनी निर्वासितांचे लोंढे रोखणाऱ्या ‘टायटल 42’सारख्या तरतुदी रद्द करण्यावर भर दिला आहे.

त्यामुळे रिपब्लिकन पक्षाची सत्ता असलेल्या टेक्सास व फ्लोरिडा प्रांतात जबरदस्त नाराजी तसेच संतापाचे वातावरण आहे. टेक्सासचे गव्हर्नर ॲबॉट या मुद्यावर अधिक आक्रमक झाले असून त्यांनी निर्वासितांविरोधात ‘ऑपरेशन लोन स्टार’ नावाची मोहिमही सुरू केली आहे. याअंतर्गत अवैध निर्वासितांना रोखण्यासाठी जवळपास तीन अब्ज डॉलर्सची तरतूद घोषित केली आहे. हा निधी ‘नॅशनल गार्डस्‌‍’ची तैनाती तसेच ‘बॉर्डर वॉल’च्या उभारणीसाठी वापरण्यात येणार आहे. गव्हर्नर ॲबॉट यांनी 100 मैलांहून अधिक लांबीची बॉर्डर वॉल उभारण्याचे संकेतही दिलेे आहेत. त्यानंतर मे महिन्यात त्यांनी ‘वॉर पॉवर्स’चा वापर करण्याचा इशाराही दिला होता.

बायडेन यांचे आदेश धुडकावूनगेल्या आठवड्यात ‘नॅशनल गार्ड’सह इतर सुरक्षायंत्रणांच्या तैनातीचे आदेश काढून ॲबॉट यांनी ‘वॉर पॉवर्स’चा वापर सुरू केल्याचे दिसत आहे. गव्हर्नर ॲबॉट यांच्या आदेशानुसार 10 हजारांहून अधिक जवान तैनात करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तैनात झालेल्या तुकड्यांवर अवैध निर्वासितांना ताब्यात घेऊन पुन्हा मेक्सिकोत धाडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. टेक्सासमधील प्रसारमाध्यमे तसेच सोशल मीडियावर ही कारवाई सुरू झाल्याचे सांगणारे फोटोग्राफ्सही प्रसिद्ध करण्यात येत आहेत.

टेक्सासच्या गव्हर्नरनी केलेल्या या कारवाईला न्यायालयात आव्हान देण्यासाठी बायडेन प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. स्वयंसेवी गटांनीही ॲबॉट यांच्यावर टीकास्त्र सोडले असून कायदेशीर कारवाईचा इशारा दिला.

leave a reply