रशियाने ‘नॉर्ड स्ट्रीम’ इंधनवाहिनी बंद केल्याने युरोपची अस्वस्थता वाढली

Russia-shutdownमॉस्को/बर्लिन – रशियाने युरोपिय देशांना इंधनवायुचा पुरवठा करणारी ‘नॉर्ड स्ट्रीम 1′ ही इंधनवाहिनी बंद करण्याची घोषणा केली. दुरुस्ती व देखभालीसाठी सोमवारपासून ही इंधनवाहिनी 10 दिवसांसाठी इंधनपुरवठा करणार नाही, असे रशियाकडून सांगण्यात आले. गेल्याच महिन्यात रशियाने या इंधनवाहिनीतून करण्यात येणारा पुरवठा तब्बल 60 टक्क्यांनी घटविला होता. त्याचवेळी फ्रान्स, इटली व ऑस्ट्रियातील कंपन्यांना होणारा इंधनपुरवठाही कमी करण्यात आल्याचे समोर आले आहे. गेल्या दोन महिन्यात रशियाने सातत्याने इंधनवायुचा पुरवठा कमी करण्याची पावले उचलल्याने युरोपिय देशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

Nord-Streamगेल्या महिन्यात तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करून रशियाने युरोपातील आघाडीचा देश असणाऱ्या जर्मनीचा इंधनपुरवठा घटविला होता. त्यानंतर जर्मन सरकारने धावाधाव करून व युक्रेनचा विरोध धुडकावून रशियाची तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी पावले उचलली होती. त्यासाठी थेट कॅनडा सरकारशी बोलणी करून रशियावर टाकलेल्या निर्बंधांमधून सवलत मिळविण्यात यश मिळविले होते. मात्र जर्मनीच्या या हालचालींना रशियाने फारसे महत्त्व दिले नसून युरोपिय देशांना धक्का देण्याची तयारी सुरू केल्याचे दिसत आहे.

Robert-Habeckदशकभरापूर्वी कार्यान्वित झालेली ‘नॉर्ड स्ट्रीम 1′ इंधनवाहिनी ही ‘सब-सी’ प्रकारातातील जगातील सर्वाधिक लांबीची इंधनवाहिनी आहे. तब्बल 1,200 किलोमीटर्सहून अधिक लांबीच्या या इंधनवाहिनीतून युरोपिय देशांना दरवर्षी 1.9 ट्रिलियन घनफूट इतक्या प्रचंड प्रमाणात इंधनवायू पुरविण्यात येतो. रशियाच्या वायबोर्गपासून ते जर्मनीच्या लुबमिन शहरापर्यंत असलेल्या या इंधनवाहिनीत रशियाव्यतिरिक्त जर्मन, फ्रेंच व डच कंपन्यांची भागीदारी आहे. रशियातून युरोपिय देशांना पुरविण्यात येणाऱ्या इंधनाचा पुरवठा वाढविण्यासाठी ‘नॉर्ड स्ट्रीम 2′ ही इंधनवाहिनीही उभारण्यात आली होती. मात्र त्याला जर्मन सरकारने परवानगी नाकारली.

‘नॉर्ड स्ट्रीम 1’चा इंधनपुरवठा तात्पुरता बंद करण्यापूर्वीच रशियाने युरोपिय देशांचा इंधनपुरवठा कमी करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे युरोपिय देशांमध्ये इंधनाचा राखीव साठा फारसा शिल्लक नाही. अशा परिस्थितीत रशियाने इंधनपुरवठा पूर्णपणे रोखला तर युरोपिय देशांचे धाबे दणाणतील, असे संकेत युरोपिय नेते व उद्योगक्षेत्राकडून देण्यात येत आहेत. जर्मनीचे वाणिज्यमंत्री रॉबर्ट हॅबेक यांनी रशियन इंधनपुरवठा कदाचित पुन्हा कधीच सुरू होणार नाही, अशी भीती व्यक्त केली. तर फ्रान्समधील ‘मिशेलिन’ या कंपनीचे प्रमुख फ्लॉरेंट मेनेगॉक्स यांनी, फ्रेंच उद्योगक्षेत्राने तेल व कोळशावर चालणाऱ्या यंत्रणा कार्यरत केल्याचे संकेत दिले आहेत.

leave a reply