बीजिंग – राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी राबविलेल्या ‘झीरो कोविड पॉलिसी’चे फटके बसलेल्या चीनच्या अर्थव्यवस्थेसमोर आता नवे आव्हान उभे राहिले आहे. अमेरिका व युरोप या प्रमुख बाजारपेठांमधील ग्राहकोपयोगी उत्पादनांची मागणी घटण्यास सुरुवात झाली आहे. त्याचा थेट परिणाम चीनच्या उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांवर होत असून चिनी कंपन्यांकडील मागण्यांमध्ये जवळपास 30 टक्क्यांची घट झाल्याची माहिती देण्यात आली. महागाईचा भडका व ‘कॉस्ट ऑफ लिव्हिंग क्रायसिस’मुळे पाश्चिमात्य जनतेने खरेदीचे प्रमाण केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा दावा विश्लेषक व तज्ज्ञांनी केला.
गेल्या काही महिन्यात चीनमध्ये सातत्याने कोरोनाचे नवे उद्रेक समोर आले आहेत. यात राजधानी बीजिंग व आर्थिक केंद्र असलेल्या शांघायमधील उद्रेक लक्ष वेधून घेणारे ठरले होते. हे उद्रेक रोखण्यासाठी चीनच्या सत्ताधारी राजवटीने ‘झीरो कोविड पॉलिसी’ची कठोर अंमलबजावणी केली होती. त्याचा थेट फटका चीनमधील उत्पादन क्षेत्र तसेच जागतिक पुरवठा साखळीला बसला होता. चीनच्या या धोरणावर नाराज झालेल्या अनेक परदेशी कंपन्यांनी आपल्या ‘ऑर्डर्स’ पुढे ढकलण्याचा तसेच स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा परिणाम चीनच्या उत्पादन क्षेत्रावर होऊन त्यात जवळपास तीन टक्क्यांची घट झाली होती.
‘झीरो कोविड पॉलिसी’ शिथिल झाल्यानंतर उत्पादन व पुरवठा सुरळीत होईल, अशी अपेक्षा वर्तविण्यात येत होती. मात्र पाश्चिमात्य देशांमध्ये रशिया-युक्रेन युद्धाचे तीव्र परिणाम झाले असून महागाईचा जबरदस्त भडका उडाला आहे. या कडाडलेल्या महागाईमुळे पाश्चिमात्य नागरिकांची क्रयशक्ती घटली आहे. यामुळे खरेदीचे प्रमाणही घसरले आहे. अनेक कंपन्यांकडे आयात केलेल्या उत्पादनांचे प्रचंड साठे तसेच पडून आहेत. त्याचा परिणाम आयातीवर झाला असून मोठ्या कंपन्यांनी आपली आयात कमी केली आहे. अर्थतज्ज्ञ व विश्लेषकांनीही आयात घटण्यामागे ही कारणे असल्याचे मान्य केले आहे.
परदेशातील या घसरलेल्या मागणीमुळे चिनी कंपन्यांना उत्पादन घटविणे भाग पडत आहे. काही चिनी कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांची मागणी 30 ते 40 टक्क्यांनी घटल्याची कबुली दिली. जागतिक अर्थव्यवस्थेला पुढील एक ते दोन वर्षात आर्थिक मंदीचा फटका बसण्याची भाकिते आघाडीच्या वित्तसंस्थांनी वर्तविली आहेत. पाश्चिमात्य देशांमधील मागणी कमी होण्यामागे संभाव्य मंदीची भीती हा देखील एक घटक असल्याचे समोर आले.
चीनची अर्थव्यवस्था आजही निर्यातीवर आधारलेली अर्थव्यवस्था आहे. अमेरिका व युरोपिय देशांबरोबरील व्यापारातून चीनने आतापर्यंत जबरदस्त फायदा उचलला असून चीनच्या आर्थिक विकासामागे हा प्रमुख घटक ठरला आहे. मात्र आता परदेशातून मागणी घटण्यास सुरुवात झाल्याने चीनच्या निर्यातीवर आधारलेल्या अर्थव्यवस्थेवर जबर ताण आलेला आहे. ‘झीरो कोविड पॉलिसी’मुळे चिनी अर्थव्यवस्थेला आधीच दणके बसले असताना हे नवे आव्हान चिनी अर्थव्यवस्थेला नीचांकी पातळीवर घेऊन जातील, असे संकेत मिळत आहेत.