पॅरासेल द्वीपसमुहाजवळ गस्त घालून अमेरिकेने चीनच्या निर्बंधांना आव्हान दिले

Paracel-Islandsसेऊल – ‘साऊथ चायना सी’ क्षेत्रातील चीनच्या वाढत्या वर्चस्ववादी कारवायांविरोधात अमेरिकेने पावले उचलली आहेत. बुधवारी अमेरिकेच्या विनाशिकेने साऊथ चायना सीमधील पॅरासेल द्वीपसमुहाजवळून गस्त घातली. याद्वारे चीनने सदर सागरी क्षेत्रावर लादलेल्या निर्बंधांना आव्हान दिल्याची घोषणा अमेरिकेच्या नौदलाने केली. तसेच आंतरराष्ट्रीय नियम चीनला कुठल्याही प्रकारे सागरी क्षेत्र तसेच विखुरलेल्या द्वीपसमुहांभोवती कुठल्याही स्वरुपाची ‘बेसलाईन’ आखण्याची परवानगी देत नाही, अशा शब्दात अमेरिकेने चीनला फटकारले. दरम्यान, चीनने आपली विनाशिका रवाना करून अमेरिकेच्या विनाशिकेला पिटाळल्याचा दावा ठोकला आहे.

अमेरिकन नौदलाच्या ‘सेव्हन्थ फ्लिट’ने इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील आपल्या हालचाली वाढवित असल्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे ‘युएसएस रोनाल्ड रिगन’ ही विमानवाहू युद्धनौका आपल्या ताफ्यासह या सागरी क्षेत्राच्या गस्तीवर रवाना झाली आहे. याचाच एक भाग म्हणून ‘युएसएस बेनफोल्ड’ या क्षेपणास्त्रवाहू विनाशिकेने बुधवारी सकाळी साऊथ चायना सीच्या क्षेत्रातून प्रवास केला. अमेरिकन नौदलाच्या ‘सेव्हन्थ फ्लिट’चे प्रवक्ते लेफ्टनंट निकोलस लिंगो यांनी याची माहिती दिली.

us-warshipअमेरिकेच्या विनाशिकेने आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीच्या नियमांच्या चौकटीत राहून दुसऱ्यांदा ही गस्त पूर्ण केल्याचे लेफ्टनंट लिंगो यांनी स्पष्ट केले. पॅरासेल द्वीपसमुहाजवळून आपल्या विनाशिकेने गस्त घातल्याचे अमेरिकन नौदलाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. ‘आंतरराष्ट्रीय नियमानुसार सदर सागरी क्षेत्रातून प्रत्येक देशाची जहाजे तसेच विनाशिकांना मुक्तपणे वाहतूक करण्याचा अधिकार आहे. या सागरी क्षेत्रावर एकतर्फी नियम लादण्याचा कुठलाही प्रकार बेकायदेशी ठरतो’, अशी टीका लेफ्टनंट लिंगो यांनी केली.

तर संपूर्ण साऊथ चायना सीच्या सभोवती आधाररेषा निर्माण करून चीन आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रावरही दावा सांगण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप अमेरिकन नौदलाच्या प्रक्त्यांनी केला. चीनच्या या बेकायदेशीर कारवाईला आंतरराष्ट्रीय नियमांमध्ये कुठलेही स्थान नाही, असे ताशेरे लेफ्टनंट लिंगो यांनी ओढले. पॅरासेल द्वीपसमुह हा साऊथ चायना सी क्षेत्रातील वादग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. जवळपास 150 छोट्यामोठ्या बेटांचा समावेश असलेल्या या द्वीपसमुहावर चीन तसेच व्हिएतनाम आणि तैवान हे देशही आपला अधिकार सांगत आहेत.

पण पॅरासेल अर्थात शिसा द्वीपसमुहावर दावा सांगून चीनने या बेटाचे लष्करीकरण केल्याचा आरोप अमेरिका करीत आहे. सध्या या द्वीपसमुहावर चीनचे 1,400 जवान तैनात असल्याचे ‘सीआयए वर्ल्ड फॅक्टबूक’मध्ये म्हटले आहे. या द्वीपसमुहावरील लष्करी तळ, रडार यंत्रणा व इतर संरक्षणविषयक उपकरणांचे सॅटेलाईट फोटोग्राफ्स याआधी प्रसिद्ध केले होते. अमेरिकेच्या विनाशिकेने या क्षेत्रातून गस्त घातल्यामुळे चीन अस्वस्थ झाला आहे. अमेरिकाच या सागरी क्षेत्रासाठी धोकादायक असल्याचा ठपका चीनने ठेवला.

दरम्यान, काही तासांपूर्वीच अमेरिकेने चीनला साऊथ चायना सी क्षेत्रातील चिथावणीखोर कारवाया रोखण्याची सूचना केली होती. तसेच अमेरिका फिलिपाईन्सच्या सागरी हितसंबंधांची सुरक्षा करील, असे अमेरिकेने बजावले होते. तर आग्नेय आशियाई देशांनी अमेरिकेच्या पटावरील प्यादे बनू नये, असा इशारा चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांनी दिला.

leave a reply