इस्रायल युक्रेनला संरक्षणसाहित्याची नवी खेप पोहोचविणार

संरक्षणसाहित्यजेरूसलेम – गेल्या चार महिन्यांपासून रशियाच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या युक्रेनला इस्रायल संरक्षणसाहित्यांचा पुरवठा करणार आहे. इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी या सहाय्यासाठी मंजुरी दिली आहे. युक्रेनमधील आपात्कालिन परिस्थितीसाठी नागरी संघटनांना हे सहाय्य पोहोचविणार असल्याची घोषणा इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी केली. दरम्यान, इस्रायल युक्रेनला देत असलेल्या संरक्षणसाहित्यावर रशियाने याआधी तीव्र संताप व्यक्त केला होता.

संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी मंगळवारी केलेल्या घोषणेनुसार, येत्या काही आठवड्यांमध्ये संरक्षणसाहित्य असलेले विमान युक्रेनसाठी रवाना होईल. यामध्ये 1,500 हेल्मेट्स, 1,500 प्रोटेक्टिव्ह वेस्ट्स, किमान हजार गॅस मास्क, भूसुरुंग निकामी करणारी यंत्रणा आणि इतर साहित्यांचा समावेश असेल. हे साहित्य युक्रेनमधील नागरी संघटनांना पुरविण्यात येईल. यामध्ये युक्रेनच्या लष्करासाठीच्या साहित्याचा समावेश नसल्याचे इस्रायलने म्हटले आहे.

याआधी मे महिन्यात इस्रायलने युक्रेनसाठी संरक्षणसाहित्याची पहिली खेप रवाना केली होती. यामध्ये हेल्मेट्स आणि वेस्ट्सचा समावेश असल्याचे इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले होते. तर युक्रेनने इस्रायलकडे रशियाविरोधी संघर्षासाठी ‘आयर्न डोम’ तसेच इतर शस्त्रास्त्रांची मागणी केली होती. इस्रायलने युक्रेनला सदर यंत्रणा पुरवावी, यासाठी अमेरिकेनेही इस्रायलवर दबाव टाकला होता. इस्रायलचे तत्कालिन पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी थेट शब्दात अमेरिका व युक्रेनची मागणी फेटाळली होती. इस्रायलच्या या भूमिकेवर रशियाने समाधान व्यक्त केले होते.

संरक्षणसाहित्यपण पुढच्या काही दिवसात इस्रायलचे तत्कालिन परराष्ट्रमंत्री व विद्यमान पंतप्रधान येर लॅपिड यांनी युक्रेन युद्धाप्रकरणी रशियावर जोरदार टीका केली. रशियाने युक्रेनमध्ये युद्धगुन्हे केल्याचा ठपका लॅपिड यांनी ठेवला होता. तर संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी इस्रायल युक्रेनला संरक्षणसाहित्य पुरविणार असल्याची घोषणा केली.

यानंतर रशियाने इस्रायलवर ताशेरे ओढले होते. तसेच इस्रायलने युक्रेनच्या लष्कराला शस्त्रसज्ज केले, तर त्याला योग्य प्रत्युत्तर मिळेल, असे रशियाने बजावले होते.

इस्रायल तसेच सिंगापूर आणि जर्मन कंपनीने तयार केलेले ‘मॅटाडोर’ रॉकेट्स युक्रेनच्या लष्करातील अझोव्ह बटालियनमधील जवानांकडे असल्याचे उघड झाले होते. अझोव्ह बटालियन युक्रेनच्या लष्करातील नाझी समर्थक तसेच मानवाधिकारांचे उल्लंघन करणारा गट म्हणून ओळखला जातो. युक्रेनने या गटाच्या सदस्यांना शस्त्रसज्ज करून रशियन सैन्याच्या विरोधात युद्धात उतरविले होते. त्यामुळे अझोव्ह बटालियन नामक नाझीवादी गट युक्रेनसाठी लढत असल्याचे समोर आले होते. याच अझोव्ह बटालियनने इस्रायली मॅटाडोर रॉकेट्स वापरुन रशियन रणगाडे नष्ट केल्याच्या बातम्या आल्या होत्या. यानंतर रशियाने इस्रायलला इशारा दिला होता. यानंतर इस्रायल व रशियातील संबंधात तणाव निर्माण झाला होता.

leave a reply