दुसऱ्या देशातील राजवटींविरोधात बंडासाठी अमेरिकेने सहाय्य केले

- अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांचा दावा

जॉन बोल्टनवॉशिंग्टन – परदेशातील सत्ताधारी राजवटींविरोधात बंड घडविण्यासाठी आपण सहाय्य केले होते, असा खळबळजनक दावा अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी केला. अमेरिकेतील ‘सीएनएन’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोल्टन यांनी हा दावा करताना असे बंड करण्यासाठी दीर्घकाळ व बारकाईने योजना आखावी लागते, असेही वक्तव्य केले. बोल्टन यांनी यावेळी कोणत्याही देशाचे नाव घेतलेले नाही. मात्र व्हेनेझुएला व इराणमध्ये सरकारविरोधात झालेल्या व्यापक आंदोलनांमागे अमेरिकेचा हात असल्याचे आरोप झाले होते.

जॉन बोल्टनगेल्या वर्षी अमेरिकी काँग्रेसवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात सध्या संसदेत सुनावणी सुरू आहे. या घटनेत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा हात असल्याबाबत व त्यांनीच त्याची योजना आखल्यासंदर्भातील वृत्ते प्रसिद्ध होत आहेत. बोल्टन यांनी ट्रम्प यांच्या कारकिर्दीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम पाहिले होते. त्यामुळे त्यांना यासंदर्भात विचारणा करण्यात आली. माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बंड वगैरे घडवू शकत नाहीत, असे सांगताना आपण इतर देशांमध्ये बंड घडविण्यासाठी सहाय्य केल्याचा दावा बोल्टन यांनी केला.

‘बंड घडविण्यासाठी खूप बारकाईने योजना आखावी लागते. मी अनेक देशांमध्ये बंड घडविण्यासाठी व त्यासंदर्भातील योजनांसाठी सहाय्य केले आहे’, असा दावा बोल्टन यांनी केला. ट्रम्प यांनी कधीही तसे प्रयत्न केले नव्हते, असेही बोल्टन यांनी सांगितले. इतर भागांचा उल्लेख करताना बोल्टन यांनी कोणत्याही देशाचे नाव घेतले नाही. मात्र मुलाखतीदरम्यान त्यांनी व्हेनेझुएलात अमेरिकेचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत, असे वक्तव्य केले. बेकायदा निवड झालेल्या राष्ट्राध्यक्षांची राजवट उलथण्यासाठी विरोधी पक्षाला काय करावे लागते आणि त्यात कसे अपयश येते हे व्हेनेझुएलात पहायला मिळाले, असे बोल्टन यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले.

जॉन बोल्टनजॉन बोल्टन हे 1980च्या दशकापासून अमेरिकेच्या राजनैतिक वर्तुळात कार्यरत असून न्याय तसेच परराष्ट्र विभागातील महत्त्वाचा पदांवर त्यांनी काम केले आहे. अमेरिकेचे संयुक्त राष्ट्रसंघटनेतील राजदूत म्हणूनही बोल्टन काही काळ कार्यरत होते. इराक, इराण तसेच उत्तर कोरियावर अमेरिकेने हल्ले चढवावेत, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली होती. अमेरिकेकडून इतर देशांमध्ये करण्यात येणाऱ्या हस्तक्षेपाचेही त्यांनी जोरदार समर्थन केले होते.

अमेरिकेचा परराष्ट्र विभाग तसेच गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’ने इतर देशांमधील राजवटींविरोधात कारवाया केल्याची माहिती गेल्या अनेक वर्षात सातत्याने समोर आली आहे. काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या ‘विकीलिक्स’च्या माध्यमातूनही यासंदर्भातील अनेक खळबळजनक दावे प्रसिद्ध झाले होते.

leave a reply