जपान, फिलिपाईन्स सुरक्षा सहकार्य भक्कम करणार

सहकार्य भक्कमटोकिओ – इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या वाढत्या आक्रमकतेच्या पार्श्वभूमीवर, जपान आणि फिलिपाईन्स संरक्षण सहकार्य भक्कम करणार आहे. त्याचबरोबर सागरी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर धोरणात्मक सहकार्य वाढविण्याची घोषणा उभय देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांमधील चर्चेनंतर करण्यात आली. जपान आणि फिलिपाईन्समधील सदर सहकार्यावर चीनकडून प्रतिक्रिया अपेक्षित आहे.

सहकार्य भक्कमजपानचे परराष्ट्रमंत्री योशिमास हयाशी आणि फिलिपाईन्सचे परराष्ट्रमंत्री एन्रीक मनालो यांच्यात फोनवर चर्चा पार पडली. लष्करी आणि आर्थिक सामर्थ्याच्या बळावर ईस्ट व साऊथ चायना सीमधील परिस्थिती बदलण्याच्या प्रयत्नांना जपानचा पूर्ण विरोध असल्याचे जपानचे परराष्ट्रमंत्री योशिमासा हयाशी यांनी यावेळी बजावले. उघड उल्लेख टाळला असला तरी जपानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनच्या आक्रमकतेला लक्ष्य केल्याचे दिसत आहे.

त्याचबरोबर साऊथ चायना सीमधील फिलिपाईन्सच्या सागरीसीमेचा मुद्दा आंतरराष्ट्रीय नियमांच्या चौकटीत राहून सोडविण्यासाठी जपान सहाय्य करणार असल्याचे हयाशी यांनी स्पष्ट केले. 2016 साली आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फिलिपाईन्च्या सागरीक्षेत्रातील चीनची घुसखोरी बेकायदेशीर ठरविली होती. तसेच चीनने सदर सागरी क्षेत्रातून माघार घेण्याची सूचना केली होती. पण आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाचा अवमान करुन चीनने साऊथ चायना सीमधील मनमानी सुरू ठेवली आहे. चीनची ही कारवाई आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करणारी असल्याची टीका जपानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केली.

leave a reply