अणुकरारासाठी अमेरिका इराणची कायमस्वरुपी वाट पाहणार नाही

- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन

इराणची कायमस्वरुपी वाटजेरूसलेम – ‘अणुकरारासाठी अमेरिका इराणच्या प्रतिसादाची प्रतिक्षा करीत आहे. पण अमेरिका इराणची कायमस्वरुपी वाट पाहू शकत नाही’, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी बजावले. तसेच अणुकरारासंबंधीच्या वाटाघाटींना अपयश मिळाले तर शेवटचा पर्याय म्हणून इराणविरोधात लष्कराचा वापर केला जाईल, असा इशारा बायडेन यांनी दिला. इस्रायलच्या दौऱ्यावर असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेला हा इशारा लक्ष वेधून घेत आहे. इस्रायलचे पंतप्रधान येर लॅपिड यांच्याबरोबरील चर्चेत, बायडेन यांनी इराणविरोधात कठोर भाषा वापरून इस्रायलचे समर्थन मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी इस्रायलपासून आपल्या आखात दौऱ्याची सुरुवात केली. आपल्या पहिल्या इस्रायल भेटीत राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी गेल्या कित्येक दशकांपासून अमेरिका व इस्रायलमध्ये असलेल्या जुन्या सहकार्याचा दाखला दिला. तसेच अमेरिकेचा सच्चा मित्रदेश इस्रायलच्या सुरक्षेसाठी आपले प्रशासन वचनबद्ध असल्याची बायडेन यांनी घोषणा केली. इराणच्या मुद्यावर बोलताना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सला दहशतवादी संघटनांच्या यादीत ठेवण्याचे स्पष्ट केले.

काही आठवड्यांपूर्वी बायडेन प्रशासन इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सना दहशतवादी संघटनेच्या यादीतून वगळणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. इराणबरोबरचा अणुकरार यशस्वी करण्यासाठी बायडेन हा निर्णय घेतील, असे दावे केले जात होते. बायडेन यांच्याच डेमोक्रॅट्स पक्षासह रिपब्लिकन पक्षाकडून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. तर इस्रायलने अणुकराराशी बांधिल नसल्याची घोषणा केली होती. अशा परिस्थितीत, इस्रायलच्या दौऱ्यावर आलेल्या राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सला दहशतवादी संघटनेच्या यादीत ठेवण्याचे जाहीर करून इस्रायलला खूश केले.

तसेच इराण अणुबॉम्बच्या निर्मितीकडे पावले टाकत असल्याचा आरोप अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इस्रायली वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. पण इराणबरोबरील अणुकराराच्या वाटाघाटीला आपण महत्त्व देत असल्याचेही बायडेन यांनी स्पष्ट केले. या वाटाघाटींना अपयश मिळाले तर इराणला अणुबॉम्बच्या निर्मितीपासून रोखण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून लष्करी कारवाईचा वापर केला जाईल, असा इशारा बायडेन यांनी दिला.

यानंतर गुरुवारी इस्रायलचे पंतप्रधान लॅपिड यांच्याबरोबरच्या चर्चेनंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणबरोबरील अणुकराराबाबतच्या वाटाघाटींना महत्त्व दिले. त्यामुळे आपले प्रशासन इराणबरोबर अणुकरारासाठी यापुढेही प्रयत्न करणार असल्याचे बायडेन यांनी स्पष्ट केले आहे.

leave a reply