अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्यानंतर गाझापट्टीतून इस्रायलवर रॉकेट्सचे हल्ले

जेरूसलेम – शुक्रवारी रात्री गाझापट्टीतून इस्रायलवर चार रॉकेट हल्ले झाले. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचा इस्रायल, वेस्ट बँकचा दौरा संपल्यानंतर हे हल्ले झाले. इस्रायलने देखील गाझातील हमासच्या ठिकाणांवर कारवाई केली. गेल्या वर्षभरात इस्रायल आणि हमास यांच्यात रॉकेट हल्ल्यांवरुन भीषण संघर्ष पेटला आहे. सीमेच्या दोन्ही बाजूने शेकडो रॉकेट्सचा मारा करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर, गेल्या चोवीस तासातील घटनेकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे.

गाझापट्टीतून इस्रायलवरअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष इस्रायल व वेस्ट बँकच्या दौऱ्यावर येण्याआधी इस्रायलने गाझापट्टीतील हमास व इतर दहशतवादी संघटनांना इशारा दिला होता. राष्ट्राध्यक्ष बायडेन इस्रायलच्या दौऱ्यावर असताना गाझातून रॉकेट हल्ला झाला तर त्याचे भयंकर परिणाम हमासला भोगावे लागतील, अशी धमकीच इस्रायलने दिली होती. त्याचबरोबर गाझाच्या सीमेजवळ इस्रायलने सैन्यतैनाती वाढविली होती.

गाझापट्टीतून इस्रायलवरराष्ट्राध्यक्ष बायडेन इस्रायलमध्ये असेपर्यंत गाझापट्टीतून कुठल्याही प्रकारची हालचाल झाली नाही. पण अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे विमान सौदीमध्ये दाखल होताच शुक्रवारी गाझातून इस्रायलच्या दक्षिणेकडील अश्केलॉन शहरावर रॉकेट हल्ले झाले. रॉकेट सायरन वाजल्यामुळे स्थानिकांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली. तसेच इस्रायलच्या हवाई सुरक्षा यंत्रणांनी हे रॉकेट हल्ले उधळले.

गाझातून इस्रायलवर झालेल्या या रॉकेट हल्ल्यांची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. पण पुढच्या काही तासातच शनिवारी पहाटे, इस्रायलच्या लढाऊ विमानांनी गाझापट्टीतील हमासच्या ठिकाणांना लक्ष्य केले. यामध्ये हमासचा भुयारी रॉकेट कारखाना उद्ध्वस्त केल्याची माहिती इस्रायली लष्कराने दिली. तर या कारवाईमुळे हमासला जबर धक्का बसल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला. याआधी 2020 साली इस्रायलने युएई आणि बाहरिन यांच्याबरोबर अब्राहम करार केल्यानंतरही गाझापट्टीतून अशाप्रकारे रॉकेट हल्ले झाले होते. तर गेल्या वर्षी हमासने इस्रायलवर 1400 हून अधिक रॉकेट्सचा वर्षाव केला होता. यानंतर इस्रायलने गाझावर भीषण हवाई हल्ले चढविले होते.

leave a reply