नवी दिल्ली – देशाच्या अर्थव्यवस्थेला क्रिप्टोकरन्सीपासून धोका संभवतो. रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात वाटत असलेल्या चिंता जाहीरपणे नोंदविलेल्याआहेत. आर्थिक व वित्तीय स्थैर्याला क्रिप्टोकरन्सीकडून संभवणारे धोके लक्षात घेता, रिझर्व्ह बँक यावर बंदीची मागणी करीत आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. लोकसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात अर्थमंत्र्यांनी ही लक्षवेधी माहिती दिली.
क्रिप्टोकरन्सीच्या विरोधात भारताने उघडपणे भूमिका स्वीकारलेली आहे. रिझर्व्ह बँकेने 2018 सालीच क्रिप्टोकरन्सीतील व्यवहारावरून देशवासियांना सावध केले होते. या चलनातील व्यवहारांना कुठल्याही प्रकारचे कायदेशीर संरक्षण नाही. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीतील व्यवहारात फसवणूक होऊ शकते, ही बाब रिझर्व्ह बँकेने लक्षात आणून दिली होती. सोमवारीही लोकसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात केेंद्रीय अर्थमंत्र्यांनी क्रिप्टोकरन्सीला कुठलाही वैध आधार नाही, असे बजावले आहे.
कुठल्याही देशांच्या चलनांमागे त्या देशाची मध्यवर्ती बँक असते, मात्र क्रिप्टोकरन्सीच्या मागे अशी कुठलीही सनदशीर यंत्रणा नाही. याच व्यवहार अंदाज व अनुमानावर आधारलेे असतात, असे सांगून यातील गुंतवणुकीच्या परताव्यावर देखील कुणाचे नियंत्रण नाही, याकडे अर्थमंत्र्यांनी लक्ष वेधले. म्हणूनच याचा देशाच्या आर्थिक व वित्तीय स्थैर्यावर विपरित परिणाम होऊ शकतो, असा इशारा सीतारामन यांनी दिला आहे.
असे असले तरी एखाद्या देशाने क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्यासारखी कारवाई केली तरी त्याचा फारसा प्रभाव पडणार नाही. सर्वच देशांनी यासाठी संयुक्तपणे प्रयत्न केले तरच क्रिप्टोकरन्सीवर कारवाई केली जाऊ शकते, असे अर्थमंत्र्यांनी आपल्या लेखी उत्तरात म्हटले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील एका आंतरराष्ट्रीय परिषदेत क्रिप्टोकरन्सीपासून असलेल्या धोक्याचा दाखला देऊन जगभरातील लोकशाहीवादी देशांनी याविरोधात एकजूट करावी, असे आवाहन केले होते. अवैध कारवायांसाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर केला जाऊ शको व यापासून लोकशाहीवादी देशांमधील युवापिढी धोक्यात येऊ शकते, असे पंतप्रधान मोदी यांनी या आंतरराष्ट्रीय परिषदेत बजावले होते.
भारत सातत्याने क्रिप्टोकरन्सीच्या विरोधात भूमिका घेत आहे. युक्रेनचे युद्ध तसेच इंधनाची दरवाढ यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक उलथापालथींच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला क्रिप्टोकरन्सीपासून संभवणाऱ्या धोक्याकडे लक्ष वेधले ही महत्त्वाची बाब ठरते. भारतातूनही मोठ्या परताव्याच्या आशेने क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे, असे दावे केले जातात. ही रक्कम नक्की किती आहे, याची अधिकृत पातळीवरील माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण देशाचा युवावर्ग क्रिप्टोकरन्सीकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झाल्याचे दावे काही वृत्तसंस्थांनी केले होते.