‘ज्यूईश एजन्सी’वरील रशियाच्या कारवाईचा रशिया-इस्रायल संबंधांवर गंभीर परिणाम होईल

- इस्रायलच्या पंतप्रधानांचा इशारा

‘ज्यूईश एजन्सी'जेरूसलेम – ‘रशियाबरोबरचे संबंध इस्रायलसाठी फार महत्त्वाचे आहेत. रशियामध्ये ज्यूधर्मिय मोठ्या संख्येने असून त्यांचे देखील तितकेच महत्त्व आहे. रशियन सरकारबरोबरच्या प्रत्येक चर्चेत तेथील ज्यूधर्मियांबाबत चर्चा होते. अशा परिस्थितीत, रशियातील ज्यूईश एजन्सीचे कार्यालय बंद केले तर त्याचे गंभीर परिणाम उभय देशांच्या संबंधांवर होतील’, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान येर लॅपिड यांनी दिला. गेल्या आठवड्यात रशियन सरकारने मॉस्कोमधील ज्यूईश एजन्सी बंद करण्याचे निर्देश दिले होते. यावर इस्रायलमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली असून लॅपिड सरकारने रशियासमोर दुबळेपणा दाखवू नये, अशी मागणी इस्रायलमधून होत आहे.

युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे इस्रायल आणि रशियातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. युक्रेनला शस्त्रे पुरविण्याचा निर्णय घेतल्याने रशियाने त्याविरोधात इस्रायलला समज दिली होती. तसेच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यासारख्या नेत्याला इस्रायलने शस्त्रे पुरविणे म्हणजे हिटलरला शस्त्रपुरवठा करण्यासारखे ठरते, असा शेरा रशियन परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी मारला होता. त्यावर इस्रायलमधून जहाल प्रतिक्रिया उमटली होती. या प्रकरणी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिलगिरी व्यक्त केली. यानंतरही सिरियातील इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमुळेही रशिया व इस्रायल एकमेकांसमोर खडे ठाकल्याचे समोर आले होते. या हल्ल्यांविरोधात रशियाने इस्रायलला इशारे दिले आहेत.

अशा परिस्थितीत, गेल्या आठवड्यात रशियाच्या कायदे विभागाने राजधानी मॉस्कोमधील ‘ज्यूईश एजन्सी फॉर इस्रायल’ ही संस्था बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. या संस्थेने रशियन सरकारच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला होता. यासाठी सदर संस्थेला पुढील निर्णयापर्यंत टाळे ठोकण्याची सूचना रशियन सरकारने दिली होती. यावर इस्रायलच्या सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटली. इस्रायलच्या पंतप्रधानांनी थेट शब्दात रशियाबरोबरचे संबंध बिघडण्याचा इशारा दिला. सदर प्रकरणावर चर्चा करण्यासाठी इस्रायल स्वतंत्र शिष्टमंडळ रवाना करणार आहे. रशियाने या शिष्टमंडळाला परवानगी द्यावी, अशी मागणी इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने केली.

ज्यूईश एजन्सीचे माजी प्रमुख नॅटन शारान्स्की यांनी लॅपिड यांच्या रशियाबाबतच्या भूमिकेचे स्वागत केले. पण इस्रायलच्या पंतप्रधानांनी अधिक ठामपणे रशियासमोर उभे राहण्याची आवश्यकता असल्याचे शारान्स्की म्हणाले. तर रशियातून पलायन करून इस्रायलमध्ये दाखल झालेले ज्यू धर्मोपदेशक पिनशास गोल्डस्क्मित यांनी रशियातील ज्यूधर्मियांना आणि इस्रायल सरकारला आवाहन केले. युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाने युक्रेनमधून येणाऱ्यांना रशियन नागरिकत्व देण्यास सुरुवात केली होती. त्याचा दाखला गोल्डस्क्मित यांनी दिला. तसेच रशियातील ज्यूधर्मिय या देशाला व इथल्या व्यवस्थेसाठी मोठे योगदान देत आहेत. या ज्यूधर्मियांनी इस्रायलमध्ये परतावे आणि लॅपिड सरकारने त्यांना इस्रायली नागरिकत्व बहाल करावे. यामुळे रशियात ‘ब्रेन ड्रेन’ निर्माण होईल, असा दावा गोल्डस्क्मित यांनी केला.

leave a reply