गाझा – रविवारी सिरियात इस्रायलने चढविलेल्या हवाई हल्ल्यानंतर, पॅलेस्टिनींच्या हमास संघटनेने इस्रायलविरोधी गटांना एकजुटीचे आवाहन केले. याआधी हिजबुल्लाह या इराणसमर्थक संघटनेनेही इस्रायलच्या विरोधात अशाच स्वरुपाचे आवाहन केले होते. इराण, लेबेनॉन, सिरिया, इराक व येमेनमधील इस्रायलविरोधी गट एकजूट करून एकाच वेळी आपल्या देशावर हल्ला चढवतील, असा इशारा इस्रायलच्या माजी लष्करी व गुप्तचर अधिकाऱ्यांनी याआधी दिला होता. इराण व हिजबुल्लाह तशी उघड धमकी इस्रायलला देत आहे. अशा परिस्थितीत हमासने इस्रायलच्या विरोधात केलेले हे आवाहन लक्षवेधी ठरते.
रविवारी रात्री सिरियात झ्ाालेल्या हवाई हल्ल्यामध्ये तीन सिरियन जवान मारले गेल्यानंतर त्यावर हमासकडून प्रतिक्रिया आली. गाझापट्टीतील हमासचा प्रवक्ता हाझ्ोम कासेम याने इस्रायलचे हवाई हल्ले सिरियाच्या सार्वभौमत्वाचे आणि मानवाधिकारांचे उल्लंघन असल्याची टीका केली. तसेच सिरियातील हवाई हल्ले इस्रायलच्या विस्तारवादी धोरणे अधोरेखित करणारे असल्याचा आरोप हमासच्या प्रवक्त्याने केला. यासाठी कासेम याने गेल्या दोन आठवड्यांमधील घटनांचा दाखला दिला.
गाझापट्टी आणि त्यानंतर वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनींवर हल्ले चढवून इस्रायलने आपले विस्तारवादी धोरण जगजाहीर केले होते. आता सिरियात भीषण हल्ले चढवून इस्रायल आपले इरादे अधिक स्पष्ट करीत असल्याचा ठपका कासेमने ठेवला. तसेच इस्रायलला रोखण्यासाठी सर्व इस्रायलविरोधी गटांना हमासच्या प्रवक्त्याने एकजुटीचे आवाहन केले. यासाठी आखाती देशांनी इस्रायलविरोधात आघाडी उघडावी, असे कासेम सुचवित आहे. गेल्या दीड महिन्यात इस्रायलच्या विरोधात अशाप्रकारे तिसरे आवाहन केले जात असल्याचे दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी तर लेबेनॉनमधील हिजबुल्लाह या इराणसंलग्न दहशतवादी संघटनेचा प्रमुख हसन नसरल्ला यांनी इस्रायलविरोधात आघाडी उघडण्यासाठी समविचारी देश तसेच गटांना आवाहन केले होते. याला आखाती-अरब देशांकडून प्रतिसाद मिळण्याची शक्यता नाही. पण लेबेनॉनमधील हौथी, इराक-सिरियातील इराणसंलग्न छोटे गट, येमेनमधील हौथी बंडखोर आणि गाझ्ाापट्टीतील हमास, इस्लामिक जिहाद यासारख्या संघटना इस्रायलविरोधी संघर्षात एकत्र येऊ शकतात, असा इशारा इस्रायलच्या माजी लष्करी व गुप्तचर अधिकाऱ्यांनी दिला होता.
दरम्यान, गेल्या दहा दिवसात गाझ्ाातील पीआयजे या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर रॉकेट हल्ले चढविले. तर वेस्ट बँक तसेच जेरूसलेममधील पॅलेस्टिनी कट्टरवाद्यांकडून इस्रायली जनता व सुरक्षा यंत्रणेवरील हल्ले वाढले आहेत. तर लेबेनॉनमधील हिजबुल्लाहने इस्रायलच्या सीमेजवळ रॉकेट्स व क्षेपणास्त्रांची जमवाजमव सुरू केल्याच्या बातम्या येत आहेत. अशा परिस्थितीत, हमासचे हे आवाहन इस्रायलच्या सुरक्षेला आव्हान देणारे ठरू शकते.