तैपेई – नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीला बारा दिवस उलटल्यानंतरही चीन आगपाखड करीत आहे. अशा परिस्थितीत आणखी पाच अमेरिकन लोकप्रतिनिधी तैवानमध्ये दाखल झाले आहेत. यानंतर चीनने तैवानच्या पेंघू द्वीपसमुहाजवळ युद्धसराव सुरू करून अमेरिका व तैवानला आणखी इशारा दिला आहे. याचा अमेरिका तसेच तैवानच्या निर्धारावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. पुढच्या काळात युरोपिय देशांचे नेते व अधिकारी देखील तैवानचा दौरा करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.
अमेरिकन सिनेटर एड मार्की, जॉन गारामेंडी, ॲलन लॉवेंथल, डॉन बेएर आणि औमुआ रॅडवॅगेन यांचे शिष्टमंडळ सोमवारी तैपेई विमानतळावर दाखल झाले. अमेरिकेचे ही शिष्टमंडळ दोन दिवसांच्या तैवान भेटीवर असून तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वु यांनी त्यांचे स्वागत केले. अमेरिकन शिष्टमंडळ तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांची भेट घेऊन द्वीपक्षीय सहकार्य तसेच क्षेत्रीय सुरक्षा आणि व्यापारावर चर्चा करणार असल्याची माहिती तैपेईमधील अमेरिकेचे सांस्कृतिक केंद्राने दिली. तैवानमधील अमेरिकेचे सांस्कृतिक केंद्र म्हणजे दूतावासासारखे असल्याचा दावा केला जातो.
पेलोसी यांच्याप्रमाणे लोकप्रतिनिधींच्या या तैवान भेटीबाबत अमेरिकेने गाजावाजा केला नाही. पेलोसी यांच्या तैवान भेटीनंतर चीनकडून आलेल्या तीव्र प्रतिक्रियेमुळे बायडेन प्रशासनाने लोकप्रतिनिधींची सदर भेट अतिशय दाबून ठेवल्याचा दावा केला जातो. पण अमेरिकन लोकप्रतिनिधींच्या या तैवान भेटीवर चीनमधून त्वरीत प्रतिक्रिया उमटली आहे. चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने सोमवारी तैवानच्या आखातातील ‘पेंघू’ द्वीपसमुहाजवळ युद्धसराव सुरू केला. चीनच्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न झालाच तर त्याला उत्तर देण्याची तयारी म्हणून या युद्धसराव सुरू केल्याचे चीनच्या ईस्टर्न कमांडने जाहीर केले.
‘चीनचे लष्कर क्षेत्रिय एकात्मकता आणि सार्वभौमत्वाच्या सुरक्षेची तयारी करीत आहे आणि युद्धासाठीही तयार आहे. तैवानच्या स्वातंत्र्याची मागणी करणारे विघटनवादी गट आणि परदेशी हस्तक्षेप चीनचे लष्कर चिरडून टाकेल’, असा इशारा चीनच्या संरक्षण मंत्रालयाने स्वतंत्र निवेदनातून दिला. थेट उल्लेख टाळला असला तरी चीनने तैवानमधील इंग-वेन यांच्या लोकशाहीवादी सरकार आणि अमेरिका व जपानला देखील बजावल्याचा दावा केला जातो.
चीनकडून तैवान व पाश्चिमात्य देशांना धमकावणे सुरू असले तरी याचा परिणाम अमेरिका, युुरोपिय देश आणि तैवानच्या निर्धारावर होणार नाही. चीनने तैवानच्या सभोवती सहा ठिकाणी लाईव्ह फायर युद्धसराव सुरू केल्यानंतरही तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वु यांनी गेल्याच आठवड्यात युरोपिय देशांच्या शिष्टमंडळाला तैवान भेटीचे आमंत्रण दिले होते.
जर्मनीचे लोकप्रतिनिधी लवकरच तैवानला भेट देणार असल्याच्या बातम्या येत आहेत. तर चीनने जर्मनीला देखील धमकावल्याची माहिती समोर आली होती.
दरम्यान, चीनने तैवानच्या आखाताजवळ लष्करी हालचाली वाढविल्या आहेत. चीनची लढाऊ विमाने आणि विनाशिका तैवानवर हल्ल्याच्या तयारीत असल्याचा दावा चिनी सोशल मीडियातून केला जात आहे. कुठल्याही क्षणी चीन तैवानमध्ये आपले लष्कर घुसवू शकतो व यासाठी सर्वस्वी अमेरिका जबाबदार असेल, असे दावे सोशल मीडियातून केले जात आहेत.