युक्रेनी लष्कराकडून क्रिमिआ व मेलिटपोलवर हल्ले

-रशियन तळांचे नुकसान केल्याचा दावा

ukraine

कव्ह/मॉस्को – रशिया डोन्बासमधील हल्ल्यांची तीव्रता वाढवित असतानाच युक्रेनच्या लष्कराने रशियाच्या ताब्यातील क्रिमिआ व मेलिटपोलवर मोठे हल्ले केले. क्रिमिआ प्रांतातील मेस्कोय भागातील रशियन लष्करी तळावर हल्ला केल्याचे सांगण्यात येते. तर झँकोईमध्ये इलेक्कि सबस्टेशनला लक्ष्य करण्यात आले. झॅपोरिझिआ प्रांतातील मेलिटपोल शहरातील रशियन तळ उडविण्यात आल्याचा दावा युक्रेनने केला आहे. तसेच दक्षिण युक्रेनमधील खेर्सन प्रांतातील रेल्वे ब्रिजची मोठी हानी घडविण्यात आल्याचेही उघड झाले.

Attacks-on-Crimeaगेल्या काही दिवसांपासून रशियाने डोन्बासमधील हल्ल्यांची तीव्रता वाढवून काही भाग ताब्यात घेण्यात यश मिळविले होते. हे हल्ले सुरू असतानाच दक्षिण युक्रेनमधील आघाडी अधिक मजबूत करण्यासाठी लष्करी तुकड्यांची पुनर्रचना करण्याच्याही हालचाली सुरू होत्या. रशियाच्या या हालचालींना धक्का देण्यासाठी युक्रेनने दक्षिण युक्रेनमधील रशियाच्या ताब्यात असलेल्या भागांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात याला फारसे यश मिळाले नव्हते. मात्र गेल्या दोन आठवड्यांमध्ये युक्रेनच्या हल्ल्यांमध्ये रशियाचे मोठे नुकसान होत असल्याचे समोर येत आहे.

Crimea-Mellitpolगेल्या आठवड्यात युक्रेनने रशियाच्या ताब्यातील क्रिमिआ प्रांतात असलेल्या संरक्षणतळाला लक्ष्य केले होते. या हल्ल्यात रशियाला किमान सात लढाऊ विमाने गमवावी लागली होती. यामुळे रशियाच्या ‘ब्लॅक सी फ्लीट’ला मोठा धक्का बसल्याचा दावा करण्यात आला होता. याचे सॅटेलाईट फोटोग्राफ्सही प्रसिद्ध करण्यात आले होते. या हल्ल्यानंतर युक्रेनने पुन्हा एकदा क्रिमिआला लक्ष्य केले. मंगळवारी क्रिमिआतील रशियाच्या लष्करी तळावर स्फोट होऊ मोठी आग लागली. यात रशियन शस्त्रसाठ्याचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. लष्करी तळाबरोबरच नजिकच्या भागातील वीजकेंद्रातही स्फोट झाल्याचे तसेच आगीचे लोळ उठल्याचे दिसून आले. लष्करी तळ तसेच वीजकेंद्रावर युक्रेनी तुकड्यांनी हल्ला केल्याचा दावा सूत्रांनी केला.

क्रिमिआपाठोपाठ झॅपोरिझिआ प्रांतातील मेलिटपोल शहरातही युक्रेनने हल्ले केले. या भागातील लष्करी तळ उडवून दिल्याची माहिती युक्रेनी माध्यमे तसेच सूत्रांनी दिली. मात्र रशियाने त्याला दुजोरा दिलेला नाही. दक्षिण युक्रेनच्या खेर्सन प्रांतातील महत्त्वाचा रेल्वेब्रिज उडवून देण्यात आला आहे. यामुळे या भागात असणाऱ्या रशियन लष्कराला शस्त्रे तसेच इतर रसद मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता वर्तविण्यात येते. खेर्सनमध्ये सध्या रशियाचे 20 हजार जवान तैनात आहेत. पूर्व युक्रेनमधील रशियाचे हल्ले परतविल्याचा दावाही युक्रेनकडून करण्यात आला आहे.

leave a reply