भारत-फ्रान्स ‘ट्रायलॅटरल डेव्हलपमेंट कोऑपरेशन’वर काम करणार

- परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर

'ट्रायलॅटरल डेव्हलपमेंट कोऑपरेशन’नवी दिल्ली – भारत आणि फ्रान्सने इंडो-पॅसिफिक क्षेत्रात त्रिपक्षीय विकास सहकार्यावर काम करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केली. काही महिन्यांपूर्वीच भारताने ‘ट्रायलॅटरल डेव्हलपमेंट कोऑपरेशन’ (टीडीसी) फंडची घोषणा केली होती. चीनचा या क्षेत्रातील प्रभाव कमी करण्यासाठी, तसेच चीनच्या बेल्ट ॲण्ड रोड इनिशिएटिव्हला (बीआरआय) भारताचे उत्तर म्हणून या योजनेकडे पाहिले जात आहे. याद्वारे इंडो-पॅसिफिक क्षेत्रात भारत इतर देशांबरोबर विविध सहकार्य योजनांतर्गत काम करणार आहे. ‘इंटरनॅशनल सोलार अलायन्स’च्या चौकटीत राहून फ्रान्सबरोबरील हे त्रिपक्षीय सहकार्य पुढे नेण्यात येणार आहे.

फ्रान्सच्या परराष्ट्रमंत्री कॅथरिन कोलोना भारताच्या दौऱ्यावर असून त्यांनी बुधवारी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. युक्रेन युद्धापासून ते विविध जागतिक विषयांवर यावेळी बोलणी पार पडली. बहुपक्षिय सहकार्य, क्षेत्रिय संपर्क, सागरी सुरक्षा, इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील तणाव, अफगाणिस्तान या विषयांवरही चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये मजबूत धोरणात्मक भागीदारी आहे. दोन्ही देशांमधील हे सहकार्य जगात शांतता आणि स्थैर्य आणण्यासाठी असल्याचे यावेळी फ्रान्सच्या परराष्ट्रमंत्री कोलोना यांनी सांगितले. भारत व फ्रान्स केवळ संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातच नव्हे जागतिक प्रश्नांवरही एकत्र काम करीत असल्याचे परराष्ट्रमंत्री कोलोना यावेळी म्हणाल्या. तसेच लवकरच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्रध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

भारत आणि फ्रान्सने ‘इंडो-पॅसिफिक ‘ट्रायलॅटरल डेव्हलपमेंट कोऑपरेशन’वर काम करण्याची तयारी दर्शविल्याचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केले. याअंतर्गत या क्षेत्रात विविध विकास प्रकल्पांवर काम केले जाईल. फ्रान्सबरोबरील हे सहकार्य ‘इंटरनॅशनल सोलार अलायन्स’च्या (आयएसए) चौकटीत राहून पुढे नेण्यात येणार आहे, असे जयशंकर यांनी अधोरेखित केले.

‘आयएसए’द्वारे सध्या तीन देशांमध्ये प्रकल्प उभारले जात आहेत. भूतान, पापुआ न्यू गिनी आणि सेनेगलमध्ये हे प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे जयशंकर म्हणाले. तसेच या त्रिपक्षीय सहकार्याअंतर्गत भारतीय इनोव्हेटर्स आणि स्टार्टअपलाही व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार असल्याकडेे परराष्ट्रमंत्र्यांनी लक्ष वेधले.

फ्रान्स ही जागतिक स्तरावरील प्रमुख शक्ती आहे आणि त्याचे स्वतंत्र असे धोरण आहे. फ्रान्स हा बहुस्तंभियतेच्या उदयाचे केंद्र असून भारताच्या चिंतांना प्रतिसाद देणारा हा देश असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, ‘लडाखमध्ये ‘पॅट्रोलिंग पॉईंट १५’वरुन भारत-चीननेे सैन्य माघारी घेतले आहे. मात्र ही माघारी केवळ याच पॉईंटपुरती आहे. भारत आणि चीनमधील सीमावादावर मी सातत्याने बोलत आलो आहे. त्यामुळे याबाबतीत अधिक काही न बोलता दोन्ही देशांमधील एक समस्या सुटल्याचे मी म्हणेन’, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले. एका पॉईंटवरून चीनने माघार घेतली असली, तरी भारत-चीनमधील समस्या सुटलेली नाही. सीमावाद सुटल्याशिवाय दोन्ही देशांमधील प्रश्न सुटणार नाहीत, असे जयशंकर यांनी अधोरेखित केल्याचे या वक्तव्यातून दिसून येत आहे.

leave a reply