बिश्केक – मध्य आशियातील किरगिझिस्तान आणि ताजिकिस्तानच्या सीमासुरक्षादलांमध्ये बुधवारी संघर्ष पेटला. सीमावादावरुन सुरू झालेल्या या संघर्षात ताजिकिस्तानचा जवान मारला गेला. रशियाने दोन्ही देशांना शांती प्रस्थापित करण्याचे आवाहन केले आहे. युक्रेनमधील युद्धात अडकलेल्या रशियासाठी आर्मेनिया आणि अझरबैजानमधील संघर्ष आधीच डोकेदुखी ठरत आहे. अशा परिस्थितीत, आणखी दोन सोव्हिएत देशांमध्ये पेटलेला संघर्ष रशियासाठी आव्हान ठरत आहे.
१९९०च्या दशकात सोव्हिएत रशियाच्या विभाजनानंतर निर्माण झालेल्या किरगिझिस्तान व ताजिकिस्तानमध्ये गेली कित्येक वर्षे सीमावादावरुन तीव्र मतभेद आहेत. यासाठी दोन्ही देशांच्या लष्करामध्ये सीमेवर गोळीबाराच्या घटना घडत असतात. गेल्या वर्षीच किरगिझिस्तान आणि ताजिकिस्तानच्या लष्करात पेटलेल्या संघर्षामुळे युद्ध पेटण्यासारखी परिस्थिती निर्माण केली होती. तर यावर्षी जून महिन्यातही सीमेवरील अशाच संघर्षात ताजिकिस्तानचा एक जवान मारला गेला होता.
किरगिझिस्तान आणि ताजिकिस्तान या दोन्ही सोव्हिएत देशांमध्ये रशियाचे लष्करी तळ आहे. तसेच येत्या गुरुवारपासून उझबेकिस्तानमध्ये सुरू होणाऱ्या ‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन-एससीओ’मध्ये हे दोन्ही देश सहभागी होणार आहेत. अशा परिस्थितीत, या दोन्ही देशांमध्ये पेटलेला संघर्ष रशियाच्या चिंता वाढविणारा आहे. दोन दिवसांपूर्वी आर्मेनिया आणि अझरबैजान या दोन्ही सोव्हिएत देशांमध्ये संघर्ष पेटला आहे. त्यात किरगिझिस्तान-ताजिकिस्तानातील वाद रशियाच्या सुरक्षेला इशारा देणारे ठरू शकते.