किरगिझिस्तान-ताजिकिस्तानातील संघर्षात 94 जणांचा बळी

बिश्केक – गेल्या काही दिवसांपासून किरगिझिस्तान आणि ताजिकिस्तान या मध्य आशियाई देशांमध्ये पेटलेल्या संघर्षात 94 जणांचा बळी गेला. यामध्ये आपल्या 35 नागरिकांचा समावेश असल्याचे सांगून ताजिकिस्तानने किरगिझिस्तानवर आरोप केले. तर सीमेवरील संघर्ष थांबला असला तरी ताजिकिस्तानकडून अपप्रचाराच्या कारवाया सुरू असल्याचा ठपका किरगिझिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी ठेवला.

Kyrgyzstan-Tajikistan conflictगेल्या आठवड्यात बुधवारी किरगिझिस्तान आणि ताजिकिस्तान यांच्यात पाणीवाटप आणि सीमावादावरुन गोळीबार झाला होता. यानंतर दोन्ही देशांमध्ये संघर्षबंदी लागू करण्यात आली होती. पण पुढच्या काही तासातच दोन्ही देशांमध्ये पुन्हा संघर्ष पेटला. यावेळी ताजिकिस्तानच्या लष्कराने किरगिझिस्तानच्या सुरक्षा चौक्यांबरोबरच सीमेपलिकडील दूरवरच्या गावांवर रॉकेट आणि क्षेपणास्त्र हल्ले चढविले. यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचा बळी गेला व प्रत्युत्तरादाखल आपल्याला हल्ले चढवावे लागल्याचा आरोप ताजिकिस्तान करीत आहे.

शुक्रवारी रात्री या दोन्ही देशांमध्ये संघर्षबंदी लागू करण्यात आली होती. तोपर्यंतच्या संघर्षात 24 जणांचा बळी गेल्याचे जाहीर करण्यात आले होते. पण ताजिकिस्तान आणि किरगिझिस्तानच्या सरकारने सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, या संघर्षात 94 जण ठार झाले तर 140 हून अधिक जण जखमी झाले. दोन्ही देश या संघर्षासाठी परस्परांवर आरोप करीत आहेत. किरगिझिस्तानने आमच्या नागरिकांना लक्ष्य केल्याचा आरोप ताजिकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. तर संघर्षबंदीनंतरही ताजिकिस्तानने अपप्रचार आणि प्रक्षोभक विधाने थांबविलेली नाहीत, अशी टीका किरगिझिस्तानचे राष्ट्राध्यक्ष सादिर जापारोव्ह यांनी केली.

दरम्यान, गेल्याच आठवड्यात आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात संघर्ष पेटला होता. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केलेल्या आवाहनानंतर या दोन्ही देशांमध्ये संघर्षबंदी लागू झाली खरी. पण याला काही तासही उलटत नाही तोच किरगिझिस्तान-ताजिकिस्तान या आणखी दोन सोव्हिएत देशांच्या सीमेवर चकमक झडली. माजी सोव्हिएत देशांमध्ये एकामागोमाग एक संघर्ष पेटण्याच्या या घटनांवर रशियातील विश्लेषकांनी संशय व्यक्त केला आहे. रशियाच्या सीमेजवळील देशांमध्ये संघर्ष भडकवून रशियाच्या सुरक्षेला आव्हान दिले जात असल्याचा आरोप या रशियन विश्लेषकांनी केला होता. अद्याप उघडपणे आरोप केला नसला, तरी यामागे अमेरिकेचे कारस्थान असावे, असे संकेत रशियन विश्लेषकांकडून दिले जात आहेत.

leave a reply