देशाने ‘हायब्रिड वॉरफेअर’साठी सज्ज रहावे

- वायुसेनाप्रमुख विवेक राम चौधरी यांचा संदेश

‘हायब्रिड वॉरफेअर’साठी सज्जनवी दिल्ली – देशाच्या शत्रूंनी अत्याधुनिक तंत्रज्ञानापासून ते हायब्रिड वॉरफेअरमध्ये समाविष्ट होणाऱ्या प्रत्येक गोष्टीत फार मोठी प्रगती केली आहे. पूर्ण क्षमतेनिशी त्याचा वापर भारताच्या विरोधात केला जाऊ शकतो. हे लक्षात घेऊन भारताने ‘हायब्रिड वॉरफेअर’साठी सज्ज रहावे, असा संदेश एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी दिला आहे. जगभरातील सत्ताकेंद्रांच्या भारतविरोधी कारवायांचा धोका अधोरेखित करून, तसेच शेजारी देशांमधील सुरक्षाविषयक स्थितीकडे लक्ष वेधून वायुसेनाप्रमुखांनी हा सावधगिरीचा इशारा दिल्याचे दिसत आहे.

भारताच्या शेजारी देशांमध्ये आदर्श म्हणता येईल, अशी सुरक्षाविषयक स्थिती नाही. याचा भारताच्या सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो, हे वायुसेनाप्रमुखांनी लक्षात आणून दिले. याबरोबरच देश करीत असलेल्या आर्थिक प्रगतीबरोबरच देशाला संभवणाऱ्या धोक्यातही वाढ होत चाललेली आहे, याची सुस्पष्ट जाणीव यावेळी वायुसेनाप्रमुखांनी करून दिली. युक्रेनच्या युद्धाचा फार मोठा फटका जगभरातील सर्वच देशांना बसला आहे. काही देशांमध्ये महागाई आस्मानला भिडली असून त्यामुळे या देशांमध्ये राजकीय आणि आर्थिक अस्थैर्य माजल्याचे पहायला मिळत आहे. या सर्वांमध्ये भारताचे वेगळेपण जगभरात उठून दिसत असून भारत जबरदस्त आर्थिक प्रगती करीत आहे, याकडे एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी लक्ष वेधले.

देशाची ही प्रगती जगातील प्रमुख सत्ताकेंद्रांच्या नजरेत खुपणारी ठरेल आणि ते भारताच्या विरोधात कारस्थाने आखल्यावाचून राहणार नाहीत, ही बाब वायुसेनाप्रमुखांनी थेट उल्लेख न करता मांडली. देशाच्या शत्रूंकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बरोबरीने ‘हायब्रिड वॉरफेअर’च्या कक्षेत येणाऱ्या आघाड्यांवर फार मोठी क्षमता आहे. पूर्ण क्षमतेनिशी त्याचा भारताच्या विरोधात वापर केला जाऊ शकतो. हे लक्षात घेऊन भारताने हायब्रिड युद्धतंत्राला तोंड देण्यासाठी सज्ज रहावे, असे वायुसेनाप्रमुख पुढे म्हणाले.

देश आर्थिक प्रगती करीत असताना, सुरक्षेशी निगडीत अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच इतर आवश्यक गोष्टींवरील गुंतवणुकीत त्याचे प्रतिबिंब पडणे आवश्यक आहे, असे सांगून एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी या आघाडीवर काम सुरू झाल्याचीही माहिती दिली. भारतीय वायुसेनेला पारंपरिक, अपारंपरिक तसेच दोन्ही प्रकारच्या युद्धतंत्रांचा समावेश असलेल्या धोक्याला तोंड देण्यासाठी आपल्या क्षमतेत वाढ करावी लागेल. कारण आपण यावर चर्चा करीत असताना, नवे तंत्रज्ञान, नव्या यंत्रणा आणि वेगळ्या प्रकारच्या युद्धतंत्रावर जोरदार काम सुरू आहे. देशाच्या शत्रूंनी यात कौशल्य प्राप्त केलेले आहे. त्यामुळे त्यांच्यावर मात करणारे अधिक प्रगत तंत्रज्ञान आपल्याकडे असलेच पाहिजे, असे वायुसेनाप्रमुखांनी ठासून सांगितले.

पुढच्या काळात आपण ‘नो वॉर, नो पीस’ अर्थात युद्धही नाही आणि शांतताही नाही, अशा स्थितीत राहू शकतो, याची पूर्वसूचना वायुसेनाप्रमुखांनी दिली. याआधी देशाच्या सुरक्षेला संभवणाऱ्या धोक्यांवर बोलताना, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी जवळपास याच शब्दात सावधानतेचा इशारा दिला होता. हायब्रिड युद्धतंत्रात थेट युद्ध न पुकारता शत्रूच्या कच्च्या दुव्यांवर काम करून त्याला जेरीस आणण्याचे प्रगत तंत्र वापरले जाते. यासाठी राजनैतिक पातळीवरील मोहीमेबरोबरच, त्या देशाची आर्थिक, राजकीय व सामाजिक व्यवस्था विस्कटून टाकण्याच्या कुटील योजनांचा समावेश असतो. यासाठी दुष्प्रचार व अपप्रचाराची मोहीम राबविणे आणि त्या देशाचा आत्मविश्वास खचविण्याचेही जोरदार प्रयत्न केले जातात. हे सारे सुरू असताना, त्या देशाला लष्करी पातळीवर तडाखे देण्याचीही योजना गुप्तपणे कार्यान्वित केली जाते. भारताच्या विरोधात अशा हायब्रिड युद्धतंत्राचा वापर केव्हाच सुरू झाला आहे, असे स्पष्ट संकेत वायुसेनाप्रमुखांच्या विधानातून मिळत आहेत.

विशेषतः भारताच्या आर्थिक प्रगतीचा दाखला देऊन ही प्रगती सहन न होणारी जगभरातील प्रमुख सत्ताकेंद्रे भारताच्या विरोधात आपल्या क्षमतेचा वापर करू शकतात, याची वायुसेनाप्रमुखांनी करून दिलेली जाणीव अत्यंत महत्त्वाची ठरते.

leave a reply