निदर्शकांवर हिंसक कारवाई करणाऱ्या इराणवर अमेरिका, युरोप निर्बंध लादणार

- लंडन, पॅरिसमध्ये निदर्शकांचे इराणी दूतावासावर हल्ले

हिंसक कारवाईपॅरिस/तेहरान – माहसा अमिनी या तरुणीच्या मृत्यूनंतर गेल्या दहा दिवसांपासून इराणमध्ये पेटलेली निदर्शने व त्यावर रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सनी केलेल्या कारवाईत किमान 76 जणांचा बळी गेला. निदर्शकांना हल्लेखोर ठरवून इराणने आत्तापर्यंत 1,200 जणांना ताब्यात घेतले आहे. इराणमधील या आंदोलनाचे पडसाद पाश्चिमात्य देशांमध्ये उमटत असून लंडन, पॅरिससारख्या शहरांमध्ये इराणच्या दूतावासांवर संतप्त निदर्शकांनी हल्ले चढविल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, आपल्या अधिकारांसाठी शांततेने निदर्शने करणाऱ्यांवर इराणने हिंसक कारवाई केल्याचा ठपका ठेवूनन अमेरिका व युरोपिय महासंघाने इराणवर नवे निर्बंध लादण्यावर गंभीर विचार करीत आहे.

गेल्या 10 दिवसांमध्ये इराणमध्ये उसळलेल्या हिजाबविरोधी निदर्शनांचे नेतृत्व करण्यासाठी अनेक तरुणी समोर आल्या होत्या. यामध्ये 20 वर्षाच्या हदिस नजाफी या तरुणीचा देखील समावेश होता. भर रस्त्यात आपले केस कापून हदिसने इराणमधील खामेनी राजवटीविरोधात घोषणा दिल्या होत्या. अवघ्या आठवड्याभरात हदिस इराणमधील निदर्शनांचा चेहरा बनली होती.

पण इराणमधील पत्रकार फरझाद सैफीकरन याने दिलेल्या माहितीनुसार हदिसची निघृणरित्या हत्या झाली आहे. हदिसवर सहा गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आधीच माहसाच्या हत्येमुळे पेटलेली इराणमधील निदर्शने हदिसच्या हत्येनंतर यापुढे अधिक तीव्र होतील, असा इशारा आखाती माध्यमे देत आहेत. या आंदोलनाच्या निमित्ताने इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांचा अंत होवो, अशा घोषणा दिल्या जात आहेत.

रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍स रात्रीच्या अंधारात या निदर्शकांवर कारवाई करीत असल्याचा आरोप होत आहे. तर इराणमधील या हिजाबविरोधी निदर्शनांना उत्तर म्हणून खामेनी राजवटीच्या समर्थकांनी स्वतंत्र आंदोलन छेडले आहे. राजधानी तेहरानसह काही शहरांमध्ये राजवटविरोधी निदर्शक व राजवटसमर्थक समोरासमोर आले होते. यामुळे इराणमध्ये गृहयुद्ध भडकण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा दावा केला जातो.
इराणमधील या हिजाबविरोधी आंदोलनाला पाश्चिमात्य देशांमधून जोरदार समर्थन मिळत आहे. ब्रिटन, फ्रान्स, नेदरलँड्स, नॉर्वे या युरोपिय देशांमध्ये इराणी वंशाच्या नागरिकांनी इराणमधील आंदोलनाला समर्थन दिले आहे. लंडन, पॅरिस शहरांमधील इराणच्या दूतावासावर संतप्त निदर्शकांनी हल्ले चढवून घुसखोरीचा प्रयत्न केला. यावेळी लंडनमध्ये स्थानिक सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या कारवाईत 12 जणांना ताब्यात घेतले. ब्रिटन व नॉर्वेच्या सरकारने इराणमधील निदर्शनांचे समर्थन केल्यामुळे इराणने आधीच या दोन्ही युरोपिय देशांच्या राजदूतांना समन्स बजावले होते.

दरम्यान, हिजाबविरोधी निदर्शकांवर बेदरकारपणे कारवाई करणाऱ्या इराणच्या राजवटीवर नवे निर्बंध लादण्याची तयारी अमेरिका व युरोपिय महासंघाने केली आहे. युरोपिय महासंघाच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख जोसेफ बोरेल यांनी निदर्शकांवरील कारवाईवर टीका केली. तसेच मानवाधिकारांचे उल्लंघन करणाऱ्या इराणवर लवकरच निर्बंध लादले जातील, असे संकेत अमेरिका व युरोपिय महासंघाने दिले आहेत.

leave a reply