सेऊल – उत्तर कोरियाने नव्याने लघू पल्ल्याच्या दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी केली. गेल्या आठवड्याभरात उत्तर कोरियाने चौथ्यांदा अशी चाचणी केल्याचे दक्षिण कोरियन लष्कर लक्षात आणून देत आहेत. या चाचणीद्वारे उत्तर कोरियाने अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियाने आयोजित केलेल्या पाणबुडीभेदी युद्धसरावाला इशारा देण्यासाठी उत्तर कोरियाने ही चाचणी केल्याचे दिसत आहे. तर अणुचाचणीआधी उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचण्यांचा सपाटा लावल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषक करीत आहेत.
चार दिवसांपूर्वी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी दक्षिण कोरियाचा दौरा केला. तसेच दोन्ही कोरियन देशांच्या सीमेवरील ‘डिमिलिटराईज् झोन’ची पाहणी केली. यानंतर अवघ्या काही तासातच उत्तर कोरियाने दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी केली होती. याद्वारे उत्तर कोरियाने अमेरिकेला इशारा दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. उत्तर कोरियाच्या या चाचणीवर अमेरिकेने टीका केली होती.
त्यानंतर पुढच्या काही तासात अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियाच्या नौदलाचा संयुक्त सराव पार पडला. दक्षिण कोरियाच्या सागरी क्षेत्रात पार पडलेल्या या सरावात अमेरिकेची ‘युएसएस रोनाल्ड रिगन’ विमानवाहू युद्धनौका सहभागी झाली होती. या सरावात पाणबुडीविरोधी युद्धाचा अभ्यास करण्यात आला. सदर सराव उत्तर कोरिया तसेच चीनविरोधात असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी केला होता.
या युद्धसरावाला प्रत्युत्तर म्हणून उत्तर कोरियाने शनिवारी दोन लघू पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी केली. राजधानी प्योंगँगजवळून प्रक्षेपित करण्यात आलेली ही क्षेपणास्त्रे ‘सी ऑफ जपान’च्या हद्दीजवळ कोसळली. जपान आणि दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाच्या या क्षेपणास्त्र चाचणीवर ताशेरे ओढले आहेत. उत्तर कोरियाच्या चाचण्या या क्षेत्रात अस्थैर्य निर्माण करीत असल्याचा आरोप जपान आणि दक्षिण कोरियाने केला.
तर उत्तर कोरिया अणुचाचणी घेण्याच्या तयारी असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषक करीत आहेत. यासाठी उत्तर कोरियाने लघू पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या चाचणीचा सपाटा लावल्याचे या विश्लेषकांचे म्हणणे आहे. तर होनोलुलू येथील अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडने देखील अणुचाचणीच्या तयारीत असलेल्या उत्तर कोरियाला बजावले. उत्तर कोरियाने अणुचाचणी घेऊन या क्षेत्रातील शांती धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला तर या देशाला व्यापक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडचे प्रमुख ॲडमिरल सॅम पॅपेरो यांनी दिला.