बैरूत/जेरूसलेम – ‘इस्रायलला राजनैतिक वाटाघाटींची नाही, तर फक्त ताकदीची भाषा कळते. त्यामुळे इस्रायलपासून संभवणाऱ्या धोक्यांचा सामना करण्यासाठी हिजबुल्लाह पूर्णपणे तयार आहे’, असा इशारा हिजबुल्लाहच्या वरिष्ठ नेत्याने दिला. भूमध्य समुद्रातील कारिश इंधन क्षेत्राबाबत इस्रायल आणि लेबेनॉन यांच्यात सुरू असलेली चर्चा फिस्कटली. त्यानंतर इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी हिजबुल्लाहच्या हल्ल्याची शक्यता वर्तवून इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणांनी हिजबुल्लाहविरोधी संघर्षासाठी तयार रहावे, अशी सूचना केली होती. त्यावर हिजबुल्लाहकडून ही प्रतिक्रिया आली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून भूमध्य समुद्रातील ‘कारिश’ या इंधनवायूने समृद्ध असलेल्या क्षेत्राच्या मालकीवरुन इस्रायल आणि लेबेनॉनमध्ये वाद भडकला होता. इस्रायलच्या हैफा शहरापासून 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या या सागरी क्षेत्रात 30 कोटी बॅरल्सहून अधिक इंधनवायूचा साठा असल्याचा दावा केला जातो. सदर क्षेत्र आपल्या सागरी हद्दीत असल्याचा दावा करून इस्रायलने कारिश क्षेत्रातील इंधनवायूचे उत्खनन करण्यासाठी ब्रिटीश कंपनीसह करार केला होता.
ब्रिटीश जहाजे या क्षेत्रात दाखल झाल्यानंतर लेबेनॉनच्या सरकारने आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मध्यस्थीची मागणी केली होती. त्यानंतर अमेरिकेने विशेषदूत नियुक्त करून इस्रायल व लेबेनॉनमधील सागरीवाद सोडविण्यासाठी वाटाघाटी सुरू केल्या होत्या. अमेरिकेच्या मध्यस्थीला यश मिळत असल्याचे दावे देखील करण्यात आले होते. पण हिजबुल्लाहचा प्रभाव असलेल्या सध्याच्या लेबेनॉनच्या सरकारने केलेल्या मागण्या आपल्याला मान्य नसल्याचे इस्रायलने स्पष्ट केले.
लेबेनॉनच्या सरकारने केलेल्या मागण्या उघड करण्यात आलेल्या नाहीत. पण कारिश इंधन क्षेत्राबाबतची चर्चा फिस्कटल्यानंतर हिजबुल्लाहकडून सदर क्षेत्रात किंवा इस्रायलच्या सीमेवर हल्ले चढविले जाऊ शकतात, असा इशारा इस्रायली यंत्रणा देत आहेत. इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी लष्कराला अलर्टवर राहण्याची सूचना केली.
हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्ला याने काही महिन्यांपूर्वी इस्रायलची सागरी व जमिनीवरील प्रत्येक ठिकाणे आपल्या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात असल्याचा इशारा दिला होता, याची आठवण यावेळी इस्रायलचे संरक्षणमंत्री गांत्झ यांनी करून दिली. तर हिजबुल्लाह इस्रायलच्या इंधनक्षेत्रावर हल्ला चढवू शकते, असा दावा इस्रायली गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’चे प्रमुख डेव्हिड बार्नी यांनी स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना केला. याआधी हिजबुल्लाहने कारिशच्या दिशेने हल्लेखोर ड्रोन्स रवाना केले होते. इस्रायलच्या लष्कराने वेळीच हे ड्रोन्स उद्ध्वस्त केल्यामुळे अनर्थ टळला होता.
हिजबुल्लाहच्या कार्यकारी परिषदेचा उपाध्यक्ष शेख अली दामौश याने इस्रायलला फक्त ताकदीची भाषा समजते, असे सांगून हिजबुल्लाह इस्रायलला कळेल अशा भाषेतच उत्तर देईल, असे धमकावले आहे. आपल्या हितरक्षणाच्या आघाडीवर हिजबुल्लाह कधीही शांत बसणार नसल्याचे दामौशने म्हटले आहे. याआधी हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्ला याने कारिश इंधनप्रकल्पाच्या वादावरुन इस्रायलला गंभीर परिणामांची धमकी दिली होती. लेबेनॉनचे राष्ट्राध्यक्ष मिशेल एऑन यांनी देखील नसरल्लाच्या या धमकीचे जोरदार समर्थन केले होते.