युक्रेनवरील रशियन क्षेपणास्त्रांचा मारा म्हणजे पहिला एपिसोड

रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव्ह

मॉस्को – सोमवारी रशियाने शंभराहून अधिक क्षेपणास्त्रे डागून युक्रेनमध्ये हाहाकार माजविला होता. क्रिमिआला रशियाशी जोडणाऱ्या कर्च ब्रिजवरील घातपाताचा सूड घेण्यासाठी हे हल्ले चढविल्याची घोषणा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केली होती. मात्र हे क्षेपणास्त्र हल्ले म्हणजे पहिला ‘एपिसोड’ असल्याचे सांगून रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष व सध्याचे सिक्युरिटी काऊन्सिलचे उपप्रमुख दिमित्री मेदवेदेव्ह यांनी युक्रेनवर याहूनही भीषण हल्ले होणार असल्याचा इशारा दिला. तसेच मेदवेदेव्ह यांनी युक्रेनची सध्याची राजवट उद्ध्वस्त करण्याची मागणी रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याकडे केली आहे.

putin medvedevरशियाने सोमवारी चढविलेल्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यानंतर युक्रेनची अवस्था बिकट बनली आहे. युक्रेनची राजधानी किव्हवरच 60 क्षेपणास्त्रे डागून रशियाने इथल्या पायाभूत सुविधांना लक्ष्य केले होते. याचे परिणाम युक्रेनवर झाले असून काही दिवसांपूर्वी रशियन सैन्याला मागे ढकलून मुसंडी मारणाऱ्या युक्रेनी लष्कराचे मनोधैर्य यामुळे खचल्याचे संकेत मिळत आहेत. त्यातच रशियाने पुढच्या काळातही क्षेपणास्त्रांचे हल्ले होत राहतील, असे सांगून युक्रेनवरील दडपण अधिकच वाढविले. अशा परिस्थितीत माजी राष्ट्राध्यक्ष मेदवेदेव्ह यांनी युक्रेनची सध्याची राजवट उद्ध्वस्त केल्याखेरीज रशियाने थांबता कामा नये, असे आवाहन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना केले आहे. तसेच सोमवारचे हल्ले म्हणजे पहिला एपिसोड असल्याचे सांगून पुढच्या काळात रशियाचे हल्ले अधिकच तीव्र होतील, असा इशाराही मेदवेदेव्ह यांनी दिला.

मात्र युक्रेनच्या राजवटीबाबत आपण रशियन राष्ट्राध्यक्षांकडे केलेली मागणी म्हणजे आपले वैयक्तिक मत असल्याचेही मेदवेदेव्ह यांनी स्पष्ट केले. सध्याची युक्रेनची राजवट जर्मनीच्या नाझी राजवटीसारखीच आहे. त्यापासून रशियाला फार मोठा धोका संभवतो. म्हणूनच आपली जनता व आपल्या सीमेचे रक्षण करण्यासाठी रशियाला युक्रेनमधील ही राजवट उलथावीच लागेल, असे मेदवेदेव्ह पुढे म्हणाले. याआधीही रशियाच्या काही नेत्यांनी अशाच स्वरुपाची मागणी केली होती.

युक्रेनचे युद्ध सुरू झाल्यानंतर, जुलै महिन्यात रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी युक्रेनची राजवट उलथून त्याजागी लोकनियुक्त सरकार आणण्याचे रशियाचे ध्येय असल्याचे म्हटले होते. हे ध्येय साध्य होईपर्यंत रशिया युक्रेनमधील लष्करी कारवाई थांबविणार नाही, असा दावा लॅव्हरोव्ह यांनी केला होता. वेळोवेळी रशियाचे नेते आपल्या देशाच्या युक्रेनमधील या ध्येयाची आठवण करून देत आहेत. सोमवारी रशियाने युक्रेनवर केलेल्या क्षेपणस्त्रांच्या माऱ्यानंतर, चेचेन नेते रमझान कादिरोव्ह यांनी अजूनही रशियाने खरे हल्ले सुरूच केलेले नाहीत, असे लक्षवेधी विधान केले होते. रशियाच्या लष्करी सामर्थ्याची जाणीव असलेले काही सामरिक विश्लेषक देखील अजूनही रशिया पूर्ण शक्तीनिशी युक्रेनचे युद्ध खेळत नसल्याचा दावा करीत आहेत. मात्र सोमवारी रशियाने युक्रेन व युक्रेनच्या समर्थकांना आपल्या क्षमतेची जाणीव करून दिली. त्याचवेळी युक्रेन रशियन क्षेपणास्त्रांच्या निशाण्यावर असताना, अमेरिका व पाश्चिमात्य देश काहीही करू शकले नाही, याकडे रशियासमर्थक विश्लेषक लक्ष वेधत आहेत.

leave a reply