युक्रेनप्रमाणे कुर्दांनाही इराणच्या राजवटीविरोधात शस्त्रसज्ज करा

पाश्चिमात्यांकडे इराक-इराणमधील कुर्द नेत्यांची मागणी

kurdsलंडन – ‘इराणला राजनैतिक भाषा कळत नाही, तर फक्त शस्त्रास्त्रांची भाषा कळते. त्यामुळे युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे पुरविणाऱ्या पाश्चिमात्य देशांनी इराक-इराणमधील कुर्दांना देखील शस्त्रसज्ज करावे’, अशी मागणी इराक-इराणमधील कुर्दांच्या वरिष्ठ नेत्यांनी केली. इराणच्या हवाई हल्ल्यांचे लक्ष्य ठरणाऱ्या इराकमधील कुर्दांकडे पाश्चिमात्य देशांनी पाठ फिरविल्याची टीका कुर्द नेत्यांनी केली. आयएस या दहशतवादी संघटनेविरोधात याच कुर्दांनी पाश्चिमात्य देशांना दिलेल्या सहकार्याची आठवण कुर्द नेत्यांनी करुन दिली.

इराणने कुर्दवंशिय बहुसंख्य असलेल्या कुझेस्तान प्रांतात रणगाडे आणि लष्करी वाहनांची तैनाती वाढविली आहे. इराकच्या सीमेलगतही इराणच्या लष्करी हालचाली सुरू असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे इराणचे लष्कर इराकमधील कुर्दांच्या ठिकाणांवर नवे हल्ले चढवू शकतात, असा दावा केला जातो. गेल्या तीन आठवड्यांपासून इराणचे रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍स इराकच्या कुर्दिस्तान प्रांताला लक्ष्य करीत आहे. यामध्ये निरपराध कुर्दांचा बळी जात असल्याचा संताप कुर्द नेते व्यक्त करीत आहेत.

kurd leaderअशा परिस्थितीत इराक-इराणमधील कुर्दांनी पाश्चिमात्य वर्तमानपत्राशी बोलताना, अमेरिका व युरोपिय देशांनी कुर्दांकडे पाठ वळविल्याचा आरोप केला. ‘‘‘आयएस’च्या विरोधात संघर्ष करणाऱ्या आणि पाश्चिमात्य देशांचे हितसंबंध जपणाऱ्या कुर्दांना का समर्थन दिले जात नाही. कुर्द नसते तर आयएसचे दहशतवादी युरोपमध्ये धडकले असते’’, असा इशाराच इराणमधील ‘कुर्दिस्तान फ्रिडम पार्टी-पीएके’चे प्रमुख जनरल हुसेन याझ्दानपनाह यांनी दिला. इराणमधील हिजाबसक्तीच्या विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांना आपले समर्थन असल्याचे जनरल याझ्दानपनाह यांनी स्पष्ट केले.

‘इराणचे लष्कर कुर्द मुलींवर हल्ले चढवित असताना आम्ही शांत बसणार नाही. आम्ही आमच्या मुलींचे रक्षण करू’, अशी घोषणा जनरल याझ्दापनाह यांनी केली. इराणचे हे हल्ले परतविण्यासाठी इराक-इराणमधील कुर्दांना पाश्चिमात्यांच्या सहाय्याची आवश्यकता असल्याचे याझ्दापनाह म्हणाले. पाश्चिमात्य देशांनी इराकच्या कुर्दिस्तान प्रांत ‘नो फ्लाय झोन’ जाहीर करावा. तसेच युक्रेनच्या लष्कराप्रमाणे पाश्चिमात्य देशांनी इराणच्या राजवटीविरोधात कुर्दांना शस्त्रसज्ज करावे, असे आवाहन याझ्दापनाह यांनी केले.

leave a reply