वॉशिंग्टन – आपल्या अण्वस्त्रांवर ‘कमांड’ आणि ‘कंट्रोल’ नसलेला पाकिस्तान हा जगातल्या सर्वाधिक घातक देशांपैकी एक ठरतो, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या हवाई दलातील ‘एफ-16’ विमानांसाठी 45 कोटी डॉलर्सचे पॅकेज देणाऱ्या अमेरिकीच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेले हे विधान पाकिस्तानला धक्का देणारे ठरले आहे. तर भारतीय माध्यमांनी बायडेन यांचे हे विधान उचलून धरले आहे. आपल्या भारतविरोधी व पाकिस्तानधार्जिण्या धोरणांवर भारताकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे, हे लक्षात घेऊन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तानबाबत हे विधान करून भारताला खूश करण्याचा प्रयत्न केल्याची शक्यता यामुळे समोर येत आहे. त्याचवेळी पाकिस्तानची अण्वस्त्रे कुणाच्याही नियंत्रणात नाहीत, ही अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी लक्षात आणून दिलेली बाब भारतासह साऱ्या जगाची चिंता वाढविणारी ठरत आहे.
काही दिवसांपूर्वी अमेरिकेने जाहीर केलेल्या आपल्या ‘नॅशनल सिक्युरिटी स्ट्रॅटेजी 2022’मध्ये भारताबरोबरील सहकार्याचा विशेषत्त्वाने उल्लेख करण्यात आलेला आहे. पण यात अमेरिकेने आपल्या देशाचा साधा नामोल्लेखही केलेला नाही, अशी नाराजी पाकिस्तानात व्यक्त करण्यात येत होती. त्याच्या पाठोपाठ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तानातील अण्वस्त्रांच्या सुरक्षेवर चिंता व्यक्त करून पाकिस्तानची झोप उडविली आहे. पाकिस्तानच्या सरकारने या प्रकरणी अमेरिकेच्या राजदूतांना समन्स बजावले आहे. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी केलेली विधाने तथ्यावर आधारलेली नसून ती दिशाभूल करणारी असल्याची प्रतिक्रिया पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केली. तर पाकिस्तानचे विरोधी पक्षनेते इम्रान खान यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी कशाच्या आधारावर ही विधाने केली, असा सवाल करून या प्रकरणी पाकिस्तानच्या सरकारलाही धारेवर धरले आहे.
पाकिस्तानात 160 अण्वस्त्रे असल्याचे सांगितले जाते. पाकिस्तानची राजकीय व्यवस्था डळमळीत असून या देशावर कधीही लोकनियुक्त सरकारचे पूर्ण नियंत्रण नव्हते. कट्टरवाद व दहशतवाद याने पाकिस्तानला ग्रासले असून तालिबान व इतर दहशतवादी संघटना पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून कधीही या देशाची अण्वस्त्रे मिळवू शकतील, अशी चिंता पाश्चिमात्य विश्लेषकांनी वेळोवेळी व्यक्त केली होती. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तानच्या अण्वस्त्रांवर व्यक्त केलेली चिंता लक्ष वेधून घेणारी बाब ठरते. काही दिवसांपूर्वी आपल्या बाजूने निर्णय घेणाऱ्या अमेरिकेच्या धोरणात एकाएकी झालेला बदल पाकिस्तानला कोड्यात टाकणारा असून या देशाला अमेरिका असा धक्का देईल, याची अजिबात कल्पना नसल्याचे दावे केले जात आहेत.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी पाकिस्तानला सर्वाधिक घातक देशाची उपाधी देण्याआधी, बायडेन प्रशासनाने पाकिस्तानी हवाई दलातील एफ-16 विमानांसाठी 45 कोटी डॉलर्सचे पॅकेज जाहीर केले होते. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाजवा यांनी तब्बल सात दिवसांचा अमेरिकेचा दौरा केला होता. त्यांना अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनमध्ये त्यांचे जंगी स्वागत झाल्याचे दावे केले जातात. इतकेच नाही तर अमेरिकेच्या पाकिस्तानातील राजदूतांनी भारताचा भूभाग असलेल्या पाकिस्तानव्याप्त काश्मीरचा दौरा करून या देशाला खूश करून टाकले होते. पीओकेचा उल्लेख आझाद काश्मीर असा करून पाकिस्तानातील अमेरिकेच्या राजदूतांनी भारताला चिथावणी दिली होती.
बायडेन प्रशासन हे सारे भारताला धडा शिकविण्यासाठी करीत आहे. युक्रेनच्या युद्धानंतर भारताने रशियाच्या विरोधात जाण्यास नकार देऊन अमेरिकेला दुखावले होते. त्यामुळे अमेरिका भारताला धमकावण्यासाठी पाकिस्तानचा वापर करीत असल्याचा दावा काही पाकिस्तानातील विश्लेषकांनी केला होता. म्हणून बायडेन प्रशासनाच्या या हालचालींनी पाकिस्तानला हुरळून जाण्याचे काहीच कारण नाही, असे या विश्लेषकांनी बजावले होते. त्यांचे म्हणणे अवघ्या काही दिवसातच राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी खरे करून दाखविले आहे. दरम्यान, बायडेन यांनी पाकिस्तानच्या अण्वस्त्रांवर व्यक्त केलेली चिंता म्हणजे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी अतिशय संवेदनशील विषय ठरतो. दहशतवादी व कट्टरवादी संघटनांबाबत पाकिस्तानी लष्करातील अधिकाऱ्यांना वाटत असलेला जिव्हाळा लपून राहिलेला नाही. त्यांचा वापर करून दहशतवादी संघटना व गट अण्वस्त्रे हस्तगत करून त्याचा गैरवापर करतील, असे भारतासह पाश्चिमात्य देशांनीही बजावले होते. पण आपली अण्वस्त्रे सुरक्षित असल्याचा निर्वाळा पाकिस्तानने दिला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षच या दाव्यावर विश्वास ठेवण्यास तयार नसल्याने, ही भारताच्या सुरक्षेसाठी चिंताजनक बाब ठरते. सध्या पाकिस्तानात विविध आर्थिक, राजकीय व सामाजिक कारणांमुळे माजलेले अराजक लक्षात घेता, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केलेली चिंता केवळ भारतच नाही तर आंतरराष्ट्रीय समुदायाला या मुद्यावर गंभीर विचार करण्यास भाग पाडणारी ठरते.