युरोपमध्ये अवैधरित्या घुसखोरी करणाऱ्या निर्वासितांच्या संख्येत वाढ

ब्रुसेल्स – युरोपमध्ये अवैधरित्या प्रवेश करणाऱ्या निर्वासितांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. 2022 साली पहिल्या नऊ महिन्यांमध्ये युरोपिय देशांमध्ये तब्बल सव्वादोन लाख निर्वासितांनी घुसखोरी केल्याची माहिती ‘फ्रंटेक्स’ या युरोपियन यंत्रणेने दिली. ही 2016 साला नंतरची सर्वात मोठी वाढ ठरली आहे. रशिया-युक्रेन युद्ध व आशिया तसेच आफ्रिका खंडातील वाढत्या अस्थैर्याच्या पार्श्वभूमीवर ही विक्रमी वाढ झाल्याचे समोर आले आहे. 2015 साली युरोपमध्ये 10 लाखांहून अधिक निर्वासितांनी अवैधरित्या घुसखोरी केली होती.

‘2022 सालच्या पहिल्या नऊ महिन्यांमध्ये युरोपियन देशांमध्ये 2 लाख, 28 हजार, 240 हून अधिक निर्वासितांनी अवैधरित्या घुसखोरी केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी बेकायदा प्रवेश करणाऱ्यांची संख्या तब्बल 70 टक्क्यांहून जास्त आहे. 2016 मध्ये नोंद झालेल्या अवैध घुसखोरी नंतरची ही विक्रमी आकडेवारी ठरते’, असे फ्रंटेक्सने म्हटले आहे. यावर्षी सर्वात जास्त घुसखोरी बाल्कन क्षेत्रातील देशांमधून झाल्याचे फ्रंटेक्सने आपल्या अहवालात बजावले आहे.

illegally infiltrating into Europeयुरोपमध्ये अवैधरित्या प्रवेश करणाऱ्या निर्वासितांमध्ये सिरिया, अफगाणिस्तान, तुर्की, ट्युनिशिया, इजिप्त व बांगलादेश या देशांमधून येणाऱ्या नागरिकांचा समावेश आहे. बाल्कन क्षेत्रातून एक लाखाहून अधिक तर भूमध्य सागरी मार्गाने 65 हजारांहून अधिक निर्वासितांनी अवैधरित्या प्रवेश केल्याचे फ्रंटेक्सने आपल्या अहवालात सांगितले. यात युक्रेनमधून आलेल्या निर्वासितांना सामील करण्यात आलेले नाही. गेल्या दशकात जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्या नेतृत्त्वाखाली राबविण्यात आलेल्या ‘ओपन डोअर पॉलिसी’मुळे युरोपात निर्वासितांचे लोंढे मोठ्या प्रमाणात घुसण्यास सुरुवात झाली होती. त्याविरोधातील असंतोषाची तीव्रता वाढू लागल्याने गेल्या दोन वर्षात घुसखोरी रोखण्यासाठी काही आक्रमक निर्णय घेतले होते. पण कोरोनाची साथ व रशिया-युक्रेन युद्ध या पार्श्वभूमीवर युरोपियन महासंघाकडून पुन्हा एकदा निर्वासितांना दरवाजे खुले करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. निर्वासितांची वाढती आकडेवारी त्याचेच संकेत देत आहे.

युरोपात घुसणाऱ्या आफ्रिकी व आखाती देशांमधील निर्वासितांमुळे युरोपिय समाज, मूल्ये व संस्कृती धोक्यात येत आहे. त्यामुळे युरोपियन जनतेतील असंतोष वाढत असून त्याचे गंभीर राजकीय व सामाजिक परिणामही काही देशांमध्ये दिसून येत आहेत. निर्वासितांविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या उजव्या विचारसरणीच्या पक्षांना वाढते समर्थन मिळत असून काही देशांमध्ये निर्वासितांना रोखण्यासाठी कायदेही करण्यात येत आहेत.

leave a reply