पॅलेस्टाईनच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेवरील अविश्वास निराश करणारा

अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी काऊन्सिलची टीका

America disappoints-1वॉशिंग्टन – अमेरिका पॅलेस्टाईनचा प्रश्न सोडविल, यावर आमचा विश्वास राहिलेला नाही, असे पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी म्हटले आहे. कझाकस्तानच्या अस्तानामध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या भेटीदरम्यान, पॅलेस्टाईनच्या राष्ट्राध्यक्षांनी हे विधान केले. याबरोबरच पॅलेस्टाईनचा प्रश्न सोडविण्यासाठी रशिया महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडू शकेल, असा दावा करून राष्ट्राध्यक्ष अब्बास यांनी अमेरिकेला अस्वस्थ केले. यावर त्वरित अमेरिकेची प्रतिक्रिया आली आहे. पॅलेस्टाईनच्या राष्ट्राध्यक्षांची विधाने निराश करणारी असल्याचे अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी काऊन्सिलने म्हटले आहे. इतकेच नाही तर अमेरिका पॅलेस्टाईनची समस्या सोडविण्यासाठी वचनबद्ध असल्याचे सांगून रशिया हा काही न्याय आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या पालनासाठी प्रसिद्ध असलेला देश नाही, असा दावा अमेरिकेच्या सिक्युरिटी काऊन्सिलने केला आहे.

Joe-Bidenसध्या वेस्ट बँकच्या रामल्लाह इस्रायली यंत्रणांच्या सुरू असलेल्या हालचालींवरून पॅलेस्टाईन व इस्रायलमध्ये तणाव निर्माण झाला आहे. मात्र इस्रायलच्या सरकारवर दबाव टाकून रामल्लाह येथील या कारवाया रोखण्यात अमेरिकेला यश आलेले नाही. अमेरिका आर्थिक सहाय्य करून ही राजकीय समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका राष्ट्राध्यक्ष अब्बास यांनी केली. यामुळे अमेरिका इस्रायल-पॅलेस्टाईन समस्या सोडविल यावर आपला विश्वास राहिलेला नसल्याचे अब्बास यांनी स्पष्ट केले. ही समस्या सोडवून शांतता प्रस्थापित करण्याची क्षमता अमेरिकेकडे जरूर आहे, पण अमेरिका त्यासाठी तयार नसल्याचे संकेत देऊन पॅलेस्टाईनच्या राष्ट्राध्यक्षांनी बायडेन प्रशासनाच्या हेतूवरच संशय व्यक्त केला.

तसेच अमेरिका मोठा देश असला तरी केवळ अमेरिकेलाच इस्रायल-पॅलेस्टाईनच्या समस्या सोडवू शकणार नाही, यासाठी रशियाही मध्यवर्ती मध्यस्थ म्हणून योगदान देऊ शकतो, असे पॅलेस्टाईनच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटले आहे. अमेरिकेवर टीका करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष अब्बास यांनी निवडलेली वेळ व स्थळ राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरते. कझाकस्तानची राजधानी अस्ताना येथे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादमिर पुतिन यांच्या भेटीदरम्यान राष्ट्राध्यक्ष अब्बास यांनी ही विधाने करून अमेरिकेला अस्वस्थ करून सोडले. आधीच इंधनउत्पादक अरब देशांच्या रशियाबरोबरील सहकार्याचा फटका अमेरिकेला बसलेला आहे. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी ओपेक प्लस देशांनी इंधनाचे उत्पादन कमी करू नये, असे आवाहन केले होते व त्याविरोधात सौदी व इतर आखाती देशांना धमक्याही दिल्या होत्या. याचा उलटा परिणाम झाला असून सौदी, युएई हे आखाती इंधनउत्पादक देश रशियाबरोबरील सहकार्य अधिकच दृढ करून अमेरिकेला प्रत्युत्तर देत आहेत.

America disappointsयुएईचे राष्ट्राध्यक्ष ‘शेख मोहम्मद बिन झाएद बिन अल-नह्यान’ यांनी नुकतीच रशियाला भेट देऊन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी द्विपक्षीय सहकार्य वाढविण्याबाबत चर्चा केली होती. यावर अमेरिकेतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अशा परिस्थितीत पॅलेस्टाईनच्या राष्ट्राध्यक्षांनीही अमेरिकेवर अविश्वास दाखवून रशियावर आपला अधिक विश्वास असल्याचा दावा केला आहे. यावर अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी काऊन्सिलने (एनएससी) प्रतिक्रिया दिली आहे. एनएससीचे प्रवक्त्यांनी राष्ट्राध्यक्ष अब्बास यांनी केलेली विधाने निराश करणारी असल्याचे म्हटले आहे. कित्येक दशकांपासून अमेरिका इस्रायल-पॅलेस्टाईन प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करीत असून याद्वारे आखाती क्षेत्रात शांतता व स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका वचनबद्ध असल्याचे एनएससीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. त्याचवेळी राष्ट्राध्यक्ष अब्बास विश्वास दाखवित असलेला रशिया हा काही न्याय आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या पालनासाठी प्रसिद्ध असलेला देश ठरत नाही, अशी टीका देखील एनएससीने आपल्या निवेदनात केली आहे.

leave a reply