बेल्जियमसह नॉर्थ सी क्षेत्रात नाटोच्या ‘न्यूक्लिअर एक्सरसाईज’ला सुरुवात

बेल्जियमसह नॉर्थ सी क्षेत्रात

ब्रुसेल्स – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अणुहल्ल्यांबाबत दिलेले इशारे व युरोपनजिकच्या तळांवर वाढविलेली आण्विक तैनाती या पार्श्वभूमीवर नाटोने व्यापक ‘न्यूक्लिअर एक्सरसाईज’चे आयोजन केले आहे. सोमवारपासून युरोपच्या बेल्जियमसह नॉर्थ सी क्षेत्रात ‘स्टेडफास्ट नून २२’ सरावाला सुरुवात झाली. या सरावात अमेरिका व ब्रिटनसह नाटोचे १४ सदस्य देश सहभागी झाले आहेत.

रशियाने युक्रेनमध्ये राबविलेल्या लष्करी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेसह नाटोने युक्रेनला मोठ्या प्रमाणात संरक्षणसहाय्य पुरविले आहे. त्याचवेळी युरोपातील आपली तैनाती तसेच संरक्षणसज्जताही मोठ्या प्रमाणात वाढविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यात फिनलंड व स्वीडनसारख्या देशांना नाटोत सामील करून त्या भागात नवीन क्षेपणास्त्रयंत्रणा तसेच लढाऊ विमाने तैनात करण्याचीही योजना आहे. या योजनेला रशियाने प्रखर विरोध केला आहे. नाटोच्या या हालचालींना प्रत्युत्तर देण्यासाठी रशियाने युरोपनजिकच्या तळांवर आण्विक तैनाती सुरू केली आहे.

गेल्याच आठवड्यात रशियाने नॉर्वेनजिकच्या तळावर स्ट्रॅटेजिक बॉम्बर्स तैनात केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या पार्श्वभूमीवर नाटोचा नवा ‘न्यूक्लिअर एक्सरसाईज’ लक्ष वेधून घेणारा ठरतो. या सरावात ६० लढाऊ विमाने सामील होणार असून त्यात अमेरिकेच्या ‘बी५२’ बॉम्बर्स विमानांचा समावेश आहे. नाटोच्या आण्विक सरावामुळे युरोपातील तणाव अधिक चिघळू शकतो, असे रशियोने याआधीच बजावले आहे.

leave a reply