दहशतवादी, गुन्हेगार व भ्रष्टाचाऱ्यांची आश्रयस्थाने उद्ध्वस्त करायलाच हवी

इंटरपोलच्या आमसभेत पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

नवी दिल्ली – जगाला जाणीव होण्याच्याही फार आधी भारताला सुरक्षेचे महत्त्व कळून चुकले होते. दहशतवादाशी लढताना हजारो भारतीयांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे. जगाची सुरक्षा ही आंतरराष्ट्रीय समुदायाची सामूहिक जबाबदारी ठरते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 195 सदस्यदेश असलेल्या इंटरपोलच्या आमसभेला संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते. भ्रष्टाचारी, दहशतवादी, अमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्या टोळ्या, शिकारी आणि संघटीत गुन्हेगारांपासून जागतिक सुरक्षेला फार मोठा धोका संभवतो. त्यांना कुठेही सुरक्षित आश्रय दिला जाऊ शकत नाही, ती उद्ध्वस्त करायलाच हवीत, असे बजावून इंटरपोलने याविरोधातील कारवाई अधिक गतीमान करावी, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.

Narendra-Modiनवी दिल्लीमध्ये इंटरपोलची 90 वी आमसभा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. याच्या स्मरणार्थ पंतप्रधानांनी पोस्टल स्टँप व शंभर रुपयांच्या नाण्याचे अनावरण केले. दहशतवादासारख्या भयंकर समस्येची जाणीव साऱ्या जगाला होण्याच्या फार आधीपासून भारताला याची फार मोठी किंमत चुकती करावी लागली, याची जाणीव पंतप्रधानांनी यावेळी करून दिली. जागतिक सुरक्षा ही आंतरराष्ट्रीय समुदायाची सामूहिक जबाबदारी ठरते. म्हणूनच भ्रष्टाचारी, दहशतवादी, अमली पदार्थांच्या व्यापारात गुंतलेल्या टोळ्या, शिकारी व संघटीत गुन्हेगारांना जगात कुठेही सुरक्षित आश्रयस्थाने मिळता कामा नये. एका, ठिकाणी केलेला गुन्हा म्हणजे प्रत्येकाविरोधात, साऱ्या मानवतेविरोधात केलेला गुन्हा मानला जावा, अशी अपेक्षा यावेळी पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली.

याचा केवळ आत्ताच्या जगावरच नाही, तर भावी पिढीवर परिणाम होणार आहे, ही बाब लक्षात घेऊन या गुन्हेगारांविरोधात कारवाई झाली पाहिजे. त्यासाठी पोलीस दलांना अधिकाधिक सक्षम बनविणे अत्यावश्यक ठरते. इंटरपोलसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या संघटनेने एका देशात गुन्हा करून दुसरीकडे पळ काढणाऱ्या गुन्हेगारांविरोधात ‘रेड कॉर्नर’ नोटीस जारी करण्यासाठी त्वरित हालचाली कराव्या, अशी मागणी यावेळी पंतप्रधानांनी केली. तसेच दहशतवाद हा केवळ घातपात माजविण्यापुरता मर्यादित नसून डिजिटल माध्यमातूनही कट्टरवाद व सायबर गुन्हेगारी माजविण्याचे काम दहशतवादी करीत आहेत. एका क्लिकद्वारे हल्ला घडवून साऱ्या यंत्रणांना गुडघ्यावर आणण्याचे काम सायबर दहशतवाद करू शकतो, या धोक्याची जाणीव पंतप्रधानांनी करून दिली.

या विरोधात प्रत्येक देश आपली धोरणे तयार करीत आहे. पण आपल्या सीमेत राहून याविरोधात लढा देता येणार नाही. तर त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर धोरणाची आखणी करावी लागेल, असे पंतप्रधान पुढे म्हणाले. भ्रष्टाचारी अवैध मार्गाने मिळविलेला पैसा दुसऱ्या देशात नेऊन ठेवतात. हा पैसा म्हणजे गैरव्यवहार झालेल्या देशाच्या जनतेच्या मालकीचा असतो. असा पैसा चुकीच्या गोष्टींसाठी देखील वापरला जाऊ शकतो आणि दहशतवादी कारवायांसाठीही त्याचा वापर होऊ शकतो. तसेच अमली पदार्थांच्या व्यापारामुळे कितीतरी युवकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. यामुळे मानवी तस्करीपासून ते लोकशाही व्यवस्था कमकुवत करण्यापर्यंत तसेच शस्त्रास्त्रांच्या अवैध व्यापारापर्यंत या कुमार्गाने मिळविलेल्या पैशांचा वापर केला जातो, या धोक्याकडे पंतप्रधान मोदी यांनी लक्ष वेधले.

म्हणूनच आंतरराष्ट्रीय समुदायाने अशा गुन्हेगारांचे सुरक्षित स्वर्ग नष्ट करण्यासाठी वेगाने हालचाली करायला हव्या. कोरोनाच्या काळात आपण कुठल्याही समस्येचा सामना करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ शकतो, हे भारताने सिद्ध करून दाखविलेले आहे. त्यामुळे जगभरातील समाज स्वयंकेद्री बनत चाललेला असताना, भारत आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी आवाहन करून या आघाडीवर पुढाकार घेत आहे. स्थानिक पातळीवरील कल्याणासाठी जागतिक सहकार्य – हे भारताचे आवाहन आहे. जगातील चांगल्या शक्ती एकत्र आल्या, तर गुन्हेगारी शक्ती काम करू शकत नाहीत, असा अत्यंत महत्त्वाचा संदेश भारताच्या पंतप्रधानांनी इंटरपोलच्या या आमसभेत दिला आहे.

leave a reply