रशियाला पाश्चिमात्य देशांमध्ये आपले राजनैतिक अस्तित्त्व ठेवण्याची इच्छा नाही — परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांचा दावा

मॉस्को – ‘रशियन नागरिक पाश्चिमात्य देशांमध्ये अत्यंत वाईट स्थितीत काम करीत आहेत. रशियन अधिकारी व नागरिकांसाठी सातत्याने नवनवीन अडचणी तयार करण्यात येत आहेत. रशियन नागरिकांना सातत्याने हल्ल्यांच्या धमक्या दिल्या जात आहेत. ही पार्श्वभूमी पाहता रशियाच्या पाश्चिमात्य देशांमधील राजनैतिक अस्तित्वाला अर्थ राहिला नसून रशियन राजवटीची तशी इच्छाही नाही’, अशा शब्दात रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी पाश्चिमात्य देशांशी असलेले राजनैतिक संबंध तोडण्याचे संकेत दिले.

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका, युरोप व मित्रदेशांनी रशियाविरोधात मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले आहेत. युरोपातील काही देशांनी रशियन नागरिक, संस्कृती तसेच उद्योगांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. काही देशांनी रशियन नागरिकांवर प्रवेशबंदीचाही निर्णय घेतला आहे. दुसऱ्या बाजूला रशियानेही जशास तसे प्रत्युत्तर दिले असून परदेशी नागरिक तसेच संस्थांविरोधात आक्रमक कारवाई केली आहे. त्यामुळे रशिया व पाश्चिमात्य देशांमधील संबंध दिवसेंदिवस बिघडत असून ते सुधारण्यासाठी दोन्ही बाजूंकडून सुरू असलेल्या हालचालीही थांबल्याचे सांगण्यात येते.

या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांचे वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरते. यापूर्वीही रशियाने पाश्चिमात्य देशांबरोबरील संबंध तोडण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यावेळी रशियाला संबंध सुधारण्याची इच्छा असल्याचे व तसे प्रयत्न करण्यात येत असल्याचे वारंवार सांगितले होते. मात्र युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाश्चिमात्य देशांनी घेतलेल्या टोकाच्या रशियाविरोधी भूमिकेनंतर रशियानेही त्याच धर्तीवर प्रत्युत्तर देण्याचे ठरविले असल्याचे दिसत आहे.

गेल्या काही वर्षात रशियाने अमेरिकेवर असलेले अवलंबित्व कमी करण्यात यश मिळविले असून आशिया, आफ्रिका तसेच लॅटिन अमेरिकी देशांच्या सहाय्याने पर्याय उभारण्यास सुरुवात केली आहे. आर्थिक तसेच व्यापारी पातळीवर रशियाला बऱ्यापैकी यशही मिळाले असून तंत्रज्ञान व लष्करी क्षेत्राचा विचार करता रशिया यापूर्वीच स्वयंपूर्ण देश म्हणून ओळखण्यात येतो. काही दिवसांपूर्वीच पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांनंतरही रशियाचा इंधन व इतर क्षेत्रातील व्यापार तसेच त्यातून मिळणारे उत्पन्न वाढत असल्याचे समोर आले होते. त्याचवेळी रशियावर निर्बंध टाकणाऱ्या देशांनाच छुप्या मार्गाने रशियन इंधन व इतर उत्पादनांची गरज भासत असल्याची माहितीही समोर आली होती.

leave a reply