मॉस्को/लंडन – सप्टेंबर महिन्यात ‘नॉर्ड स्ट्रीम’ इंधनवाहिनीत घडविण्यात आलेला स्फोट हे ब्रिटन व अमेरिकेचे कारस्थान असल्याचा आरोप रशियन प्रवक्त्यांनी केला. रशियाच्या गुप्तचर यंत्रणेकडे ब्रिटनचे लष्करी तज्ज्ञ हल्ल्यासाठी सूचना देत असल्याचे पुरावे आहेत, असा दावा प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी केला. तर रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने ब्रिटनच्या माजी पंतप्रधान लिझ ट्रुस यांनी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांना पाठविलेल्या मेसेजवर ब्रिटनने अधिकृत खुलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.
सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस रशिया व जर्मनीदरम्यान असणाऱ्या ‘नॉर्ड स्ट्रीम’ इंधनवाहिनीत स्फोट होऊन इंधनवायुची मोठी गळती सुरू झाली होती. हा स्फोट रशियाने घडविल्याचा आरोप पाश्चिमात्य देशांनी केला होता. मात्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी या घातपातामागे ‘अँग्लो-सॅक्सन्स’चा हात असल्याचे म्हटले होते. रशियन संरक्षणदलाने सदर घटनेचा स्वतंत्ररित्या तपासही सुरू केला होता. या तपासातून सदर स्फोट ब्रिटीश नौदलाने घडविल्याचे समोर आले होते. रशियन प्रवक्त्यांच्या वक्तव्यातून त्याला दुजोरा मिळाल्याचे दिसते.
‘नॉर्ड स्ट्रीम घातपातामागे ब्रिटनचा हात असल्याचे पुरावे आहेत. त्यांनीच हे दहशतवादी कृत्य घडविले आहे. याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. रशिया योग्य ते प्रत्युत्तर देईल’, असे रशियन सरकारचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी बजावले. तर परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या मारिआ झाखारोव्हा यांनी, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी अमेरिकी परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांना पाठविलेल्या संदेशाचा मुद्दा उपस्थित केला आहे. इंटरनेटवरील काही वेबसाईट्सवर ब्रिटनच्या माजी पंतप्रधान ट्रुस यांनी, नॉर्ड स्ट्रीममधील स्फोटानंतर ब्लिंकन यांना ‘इटस् डन’ असा संदेश धाडल्याचा दावा समोर आला आहे. या संदेशांबाबत ब्रिटनने अधिकृत खुलासा करावा, अशी मागणी झाखारोव्हा यांनी केली.
अमेरिका व ब्रिटनने संदेशासंदर्भातील दावे फेटाळले असून रशियाची वक्तव्ये तथ्यहीन असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.