वॉशिंग्टन – बेंजामिन नेत्यान्याहू लवकरच इस्रायलमध्ये प्रखर राष्ट्रवादी पक्षांचे सरकार स्थापन करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. इस्रायलच्या निवडणुकीत मिळालेल्या या विजयासाठी जगभरातील प्रमुख नेते नेत्यान्याहू यांचे अभिनंदन करीत आहेत. पण नेत्यान्याहू यांच्या विजयामुळे अस्वस्थ झालेल्या अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने सर्वप्रथम नेत्यान्याहू यांच्या विरोधकांशी संपर्क साधला आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी इस्रायलचे मावळते पंतप्रधान येर लॅपिड यांचे आभार व्यक्त केल्यानंतर पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष अब्बास यांच्याशीही फोनवरुन चर्चा केली. अमेरिका द्विराष्ट्रवादाच्या आपल्या भूमिकेबाबत वचनबद्ध असल्याचे ब्लिंकन यांनी जाहीर केले. त्याचबरोबर येत्या काळात वेस्ट बँकमध्ये हिंसाचार वाढेल, असा इशारा अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सलग दुसऱ्या दिवशी दिला.
इस्रायलमधील निवडणुकीच्या निकालाला चार दिवस उलटले आहेत. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अजूनही भावी पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांना फोन केलेला नाही. अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असलेले राष्ट्राध्यक्ष बायडेन येत्या काही दिवसात नेत्यान्याहू यांना फोन करतील, असा दावा अमेरिकेचे इस्रायलमधील राजदूतांनी केला. तर अशा काळात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांना फोन करीत आहेत, याकडे इस्रायली वृत्तवाहिन्या व विश्लेषक लक्ष वेधत आहेत.
दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी इस्रायलचे मावळते पंतप्रधान लॅपिड यांना फोन केला होता. तर शुक्रवारी ब्लिंकन यांनी वेस्ट बँकमधील पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. ‘पॅलेस्टिनी जनतेचे जीवनमान, त्यांची सुरक्षा आणि स्वातंत्र्य याला अमेरिका प्राधान्य देत आहे. त्याचबरोबर द्विराष्ट्रवादाच्या मुद्यावरही अमेरिका वचनबद्ध आहे’, असे आश्वासन ब्लिंकन यांनी दिले. तसेच वेस्ट बँकमधील हिंसाचाराबाबत अमेरिकेला तीव्र चिंता वाटत असून येत्या काळात वेस्ट बँकमधील हिंसाचार वाढेल, असा इशारा ब्लिंकन यांनी दिला.
यावेळी बोलताना पॅलेस्टिनींवरील हल्ले थांबविण्यासाठी अमेरिकेने इस्रायलवर दबाव टाकावा, असे आवाहन पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी केले. लॅपिड यांच्याबरोबर झालेल्या चर्चेतही ब्लिंकन यांनी वेस्टबँकमधील हिंसाचार वाढेल, असे बजावले होते.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि इस्रायलचे भावी पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्यात तणाव असल्याचे याआधीच उघड झाले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर सर्वप्रथम अमेरिकेच्या मित्रदेशांशी फोनवरुन चर्चा करतात. यामध्ये ब्रिटन, फ्रान्स, जर्मनीसह इस्रायल या देशांचा समावेश असतो. पण गेल्या वर्षी बायडेन यांनी अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर सर्वच देशांच्या नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर, अखेरीस इस्रायलचे तत्कालिन पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्याशी फोनवरुन चर्चा केली होती.
तर आत्ता इस्रायलमधील निवडणुकीत नेत्यान्याहू यांनी मिळविलेल्या मोठ्या विजयाला चार दिवस उलटल्यानंतरही राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी इस्रायलच्या भावी पंतप्रधानांशी संपर्क साधलेला नाही, याकडे आंतरराष्ट्रीय माध्यमे लक्ष वेधत आहेत. त्यामुळे येत्या काळात बायडेन प्रशासन आणि नेत्यान्याहू यांच्यातील संबंध तणावपूर्ण राहतील, असे दिसत आहे.