किव्ह – रशियाकडून वीजपुरवठा केंद्रांवर होणाऱ्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर राजधानी किव्हसह इतर शहरांमधील नागरिकांनी स्थलांतर करण्याची तयारी ठेवावी, असा इशारा युक्रेनच्या नेत्यांनी दिला आहे. युक्रेनची राजधानी किव्हसह आजूबाजूच्या प्रांतातील तब्बल ४५ लाख नागरिकांना सध्या ‘ब्लॅकआऊट्स’ना तोंड द्यावे लागत आहे. पुढील काळात रशिया नवे हल्ले करण्याची शक्यता असल्याने ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. रशियाने आतापर्यंत केलेल्या क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ल्यांमुळे युक्रेनमधील ४० टक्क्यांहून अधिक वीजयंत्रणा उद्ध्वस्त झाली असून अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा व इतर मूलभूत सुविधांवरही परिणाम झाल्याचे सांगण्यात येते.
ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून रशियाने क्षेपणास्त्र व ड्रोन्सच्या सहाय्याने प्रखर हल्ले करण्यास सुरुवात केली होती. एक महिना उलटल्यानंतरही रशियाचे हे हल्ले सुरू असून पुढील काळात त्यात अधिक भर पडेल, असे दावे युक्रेनी यंत्रणांकडून करण्यात येत आहेत. रशियाने पुन्हा हल्ले चढविल्यास राजधानी किव्हसह नजिकच्या भागांमधील वीज व पाणीपुरवठा कायमचा खंडित होऊ शकतो, असे संकेत स्थानिक मेयर विताली क्लिश्को यांनी दिले. किव्हमधील नागरिकांनी आपले घर सोडून काही काळासाठी नातेवाईकांकडे, मित्रांकडे किंवा इतर जागेत राहण्याची तयारी ठेवावी, असेही क्लिश्को यांनी बजावले.
रशियाच्या हल्ल्यांमुळे राजधानी किव्हसह युक्रेनमधील सात प्रमुख प्रांतांमध्ये ‘ब्लॅकआऊट्स’ची अंमलबजावणी सुरू आहे. नवे हल्ले झाल्यास या भागांमधील पाणीपुरवठा, हिटिंग सिस्टिम व इतर पायाभूत सुविधाही विस्कळीत होऊ शकतात. त्यामुळे सरकारने पर्यायी सुविधांची उभारणी सुरू केली आहे. मात्र हिवाळ्याच्या कालावधीत या सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहण्याची शक्यता कमी असल्याने युक्रेन सरकार आपल्या नागरिकांना स्थलांतराचे सल्ले देत असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, रशियाने खेर्सन प्रांतात युक्रेनी बंडखोर गटांविरोधात विशेष मोहीम सुरू केल्याचे समोर आले आहे. या मोहिमेअंतर्गत खेर्सनमध्ये राहून युक्रेनी फौजांना सहाय्य करणाऱ्या तसेच रशियन जवान व अधिकाऱ्यांवर हल्ले चढविणाऱ्या गटांना लक्ष्य करण्यात येत आहे. खेर्सनवर हल्ले करणाऱ्या युक्रेनी दलांना प्रत्युत्तर देण्यासाठी रशियाने या भागात नवी तैनाती केल्याची माहितीही उघड झाली आहे.