बायडेन-जिनपिंग यांच्यातील चर्चा म्हणजे निव्वळ ढोंग

- अमेरिकी संसद सदस्यांची घणाघाती टीका

चर्चा म्हणजे निव्वळ ढोंगवॉशिंग्टन – कोरोनाच्या साथीच्या मुद्यावरून चीनला जाब विचारण्याऐवजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन चीनच्या जिनपिंग यांचे लेक्चर ऐकत बसले. ही चर्चा म्हणजे निव्वळ ढोंग होते, अशी घणाघाती टीका अमेरिकेच्या संसद सदस्यांनी केली आहे. सोमवारी पार पडलेल्या चर्चेनंतर बायडेन यांनी, तैवानला हल्ल्याचा धोका नसल्याचा दावा केला होता. तर चीनच्या सरकारी माध्यमांनी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी तैवान ही ‘रेड लाईन’ असल्याचे बायडेन यांना बजावल्याचे म्हटले होते. त्यामुळे बायडेन यांचा कमकुवतपणा पुन्हा एकदा समोर आला असून त्यावर अमेरिकेतूनच टीकेची झोड उठत आहे.

चर्चा म्हणजे निव्वळ ढोंगअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सोमवारी इंडोनेशियात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. ‘जी२० समिट’च्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत दोन्ही राष्ट्राध्यक्षांसह उच्चस्तरिय शिष्टमंडळात तब्बल तीन तासांहून अधिक चर्चा झाल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे. अमेरिका व चीन या दोन्ही देशांनी परस्परांमधील स्पर्धा योग्य पद्धतीने हाताळून संवादाचे मार्ग खुले ठेवायला हवेत, अशी भूमिका बायडेन यांनी मांडल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले आहे.

बायडेन यांनी आपल्या चर्चेत तैवान, झिंजिआंग, तिबेट, रशिया-युक्रेन युद्ध यासारखे मुद्दे उपस्थित केले असले तरी कोरोनाच्या मुद्यावर बोलण्याचे टाळलेे. अमेरिकेतील विविध यंत्रणा चीनच्या वाढत्या धोक्याबाबत सातत्याने इशारे देत आहेत. गेल्याच महिन्यात अमेरिकेच्या वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांनी चीन २०२३ साली तैवानवर हल्ला करु शकतो, असे बजावले होते. मात्र बायडेन यांनी ही शक्यता नाकारून चीनविरोधात नव्या शीतयुद्धाची गरज नसल्याचाही निर्वाळा देत आहेत. यावर अमेरिकच्या राजकीय वर्तुळात तीव्र नाराजी पसरली असून रिपब्लिकन नेत्यांनी यासाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना धारेवर धरले.

चर्चा म्हणजे निव्वळ ढोंग‘जिनपिंग यांच्याबरोबरील चर्चेतून राष्ट्राध्यक्षांनी काय साधले हेच कळत नाही. उलट बायडेन कम्युनिस्ट पार्टीच्या धोरणांबद्दल चिनी राष्ट्राध्यक्षांचे लेक्चर ऐकत बसले. तैवानच्या मुद्यावर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पेंटॅगॉनने दिलेल्या इशाऱ्याच्या विरोधात भूमिका घेतली. त्याचवेळी चीनमधून पसरलेल्या करोनाच्या साथीत अमेरिकन्स बळी पडले, याचाही मुद्दा उपस्थित केला नाही. पुढील साथ रोखायची असेल तर चीनला कोरोनासाठी जबाबदार धरावेच लागेल’, अशा शब्दात संसद सदस्य मायकल वॉल्ट्झ यांनी बायडेन यांचे वाभाडे काढले.

कोरोनाचा उल्लेखही न होता बायडेन व जिनपिंग यांच्यात चर्चा झाली असेल तर ही बैठक म्हणजे निव्वळ ढोंग होते, असे म्हणावे लागेल अशी टीका रिपब्लिकन सदस्य लिसा मॅक्‌‍क्लेन यांनी केली. ‘सदर बैठक म्हणजे बायडेन यांच्या कमकुवत परराष्ट्र धोरणातील नवा तुरा ठरतो. आता सर्व सहन होण्यापलिकडे गेले आहे. अमेरिकेने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले सामर्थ्य दाखविण्याची हीच वेळ आहे’, असेही मॅक्‌‍क्लेन यांनी बजावले आहे.

चीनला धोका मानण्यास ब्रिटनच्या पंतप्रधानांचा नकार

चर्चा म्हणजे निव्वळ ढोंगबाली – चीन हा ब्रिटनसाठी ‘सिस्टिमॅटिक थ्रेट’ असल्याची कबुली देण्यास ब्रिटनचे पंतप्रधान ॠषी सुनक यांनी नकार दिला. ब्रिटनच्या माजी पंतप्रधान लिझ ट्रुस यांनी यासंदर्भात मांडलेल्या प्रस्तावावर सुनक यांनी गुळमुळीत भूमिका घेतली. ‘चीन धोका आहे ही भूमिका ब्रिटनच्या भागीदार देशांनी घेतलेल्या धोरणाशी सुसंगत आहे. मात्र हवामानबदलासह इतर अनेक आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी चीनची गरज आहे. जी२०च्या पार्श्वभूमीवर आपण चीनच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधण्याचाही प्रयत्न करणार आहोत’, असे पंतप्रधान सुनक म्हणाले. सुनक यांच्या या वक्तव्यावर ब्रिटनच्या सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

leave a reply