आव्हानात्मक काळात भारत जी२०ला निर्णयक्षम नेतृत्त्व देईल

बाली – भू-राजकीय तणाव, आर्थिक मरगळ, अन्नधान्य व इंधनाची दरवाढ आणि कोरोनाच्या साथीचे दुष्परिणाम समोर येत असताना, भारताकडे जी२०चे अध्यक्षपद येत आहे. अशा आव्हानात्मक काळात भारताचे हे अध्यक्षपद सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, निर्णयक्षम आणि कृतीशील असेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. इंडोनेशियाच्या बालीमध्ये पार पडलेल्या जी२० परिषदेच्या सांगता समारोहाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी बोलत होते.

leadership-G20इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी जी२०च्या अध्यक्षपदाची धुरा पंतप्रधान मोदी यांच्याकडे सोपविली. १ डिसेंबरपासून अधिकृतरित्या भारत या प्रभावशाली संघटनेचा अध्यक्ष बनेल. त्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान मोदी यांनी या संघटनेसंदर्भातील भारताची भूमिका नेमक्या शब्दात मांडली. जगासमोर खडतर आव्हाने खडी ठाकली असून अशा काळात जग G-कडे मोठ्या आशेने पाहत आहे, याची जाणीव पंतप्रधानांनी करून दिली. त्याचवेळी भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात जी२०ची धोरणे आशियाकेंद्री असतील, असे पंतप्रधान पुढे म्हणाले. याबरोबरच विकसनशील देशांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी जी२०द्वारे विशेष प्रयत्न केले जातील, असे संकेत पंतप्रधानांनी दिले आहे.

जी२०चे आयोजन ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब ठरते. पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या परिषदेच्या विविध सत्रांचे आयोजन देशाच्या विविध शहरांमध्ये केले जाईल. भारताची विविधता आणि सांस्कृतिक समृद्धीची जाणीव असलेला प्रत्येकजण लोकशाहीची जननी असलेल्या भारतातील या परिषदेत मोठ्या उत्साहाने सहभागी होईल, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला. दरम्यान, जी२०चे भारताकडे आलेले अध्यक्षपद भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्थान अधिकच उंचावणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

जगभरातील आर्थिकदृष्ट्या प्रभावशाली असलेल्या २० देशांच्या संघटनेच्या अध्यक्षपदाचा प्रभावीरित्या वापर करून भारत संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेवरील आपला दावा अधिकच भक्कम करू शकतो. याचे संकेत मिळू लागले असून या दिशेने भारताच्या नेतृत्त्वाने पावले देखील उचचली आहेत. दरम्यान, इंडोनेशियातील या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ तसेच सिंगापूर, सौदी अरेबिया, ब्राझिल, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरियाच्या नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा पार पडली. या परिषदेदरम्यान, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशीही पंतप्रधान मोदी यांची भेट झाली. पण औपचारिक हस्तांदोलनाखेरीज दोन्ही देशांमध्ये विशेष चर्चा झाली नाही. राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबरोबरील भेटीसाठी विनंती केल्याची माहिती समोर आली होती. पण व्यस्ततेमुळे त्यांना ही भेट मिळाली नसल्याचा दावा केला जातो.

leave a reply