तेल अविव – इस्रायलला जगाच्या नकाशावरुन पुसण्याची धमकी देणाऱ्या हमास व हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनांकडे दीड लाखांहून अधिक रॉकेट्सचा साठा असल्याची माहिती समोर येत आहे. लघू पल्ल्याचे रॉकेट हल्ले उधळण्यासाठी इस्रायलची आयर्न डोम यंत्रणा सज्ज आहे. पण येत्या काळात या दोन्ही संघटनांनी एकाचवेळी इस्रायलवर रॉकेट्सचा वर्षाव केला तर इस्रायलच्या लष्करासमोर मोठे आव्हान उभे राहील, असा दावा केला जातो.
गेल्या वर्षभरात गाझापट्टीतील हमासने इस्रायलवर पाच हजारांहून अधिक रॉकेट्सचा वर्षाव केला आहे. पण यानंतरही हमासकडे अजूनही ३० हजार रॉकेट्स असल्याचा अंदाज वर्तविला जातो. तर लेबेनॉनमधील हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेकडे एक लाख ३० हजारांहून अधिक रॉकेट्स असल्याचा आरोप इस्रायलने याआधीच केला होता. इराणचे समर्थन असलेल्या या दोन्ही दहशतवादी संघटनांनी एकाचवेळी हल्ले चढविले तर इस्रायलवर प्रतिदिन किमान चार हजार रॉकेट्सचा मारा होऊ शकेल.
दरम्यान, काही आठवड्यांपूर्वी इस्रायलच्या संरक्षणदलप्रमुखांनी इराणवर हल्ल्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश लष्कराला दिले होते. पण इराणवर हल्ले चढविले तर इस्रायलवर चारही बाजूंनी हल्ले होतील, अशी धमकी हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाने दिली होती. इस्रायलने गाझापट्टीजवळ तैनात केलेली ‘आयर्न डोम’ ९० टक्के वेळा रॉकेट हल्ले भेदण्यात यशस्वी होते. पण हमास व हिजबुल्लाहने एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने रॉकेट हल्ले झाले तर आयर्न डोमला यंत्रणाही असे हल्ले रोखण्यात यशस्वी ठरू शकणार नाही, असे इस्रायली लष्कराच्या निवृत्त अधिकाऱ्याने बजावले आहे.