रशिया-युक्रेन युद्धात मध्यस्थीसाठी तयार

ख्रिस्तधर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस

Russia Ukraine Warव्हॅटिकन सिटी – रशिया व युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात संघर्षविराम व्हावा यासाठी काहीही करण्यास आपण तयार असून मध्यस्थीसाठीही प्रयत्न करु, असे ख्रिस्तधर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरू आदरणीय पोप फ्रान्सिस यांनी म्हटले आहे. ‘ला स्टाम्पा’ या इटालियन दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत पोप फ्रान्सिस यांनी याआधी झालेल्या दोन महायुद्धांमधून जगाने अजूनही धडा घेतलेला नाही, याची जाणीवही करून दिली. यापूर्वी रशिया-युक्रेन युद्धावर संबोधित करताना पोप फ्रान्सिस यांनी, आपण तिसऱ्या महायुद्धाच्या काळातून जात असल्याचे बजावले होते.

इटालिन दैनिकाने ख्रिस्तधर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरू आदरणीय पोप फ्रान्सिस यांना रशिया-युक्रेन संघर्षातील शांतीचर्चेसाठी व्हॅटिकनकडून सुरू असलेल्या प्रयत्नांसंदर्भात प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना पोप फ्रान्सिस यांनी, रशिया व युक्रेन युद्धात शांतता प्रस्थापित होणे शक्य असून कोणीही याबाबत आशा सोडून देण्याचे कारण नाही, असा दावा केला. ‘प्रत्येकाने आपल्या हृदयातून संघर्षाचे विचार काढून टाकायला हवेत. हिंसाचारासाठी देण्यात येणाऱ्या शस्त्रांचा पुरवठा थांबायला हवा. आपण सर्वांना शाश्वत शांततेसाठी प्रयत्न करायला हवेत. फक्त संघर्षबंदीचा विचार केला तर त्यात पुन्हा शस्त्रसज्ज संघर्षाचा धोका आहे. वाटाघाटींच्या माध्यमातून खरी शांतता मिळू शकते’, असे पोप फ्रान्सिस म्हणाले.

pope francics‘शस्त्रांच्या माध्यमातून शांतता मिळू शकत नाही. कारण शस्त्रांच्या सहाय्याने द्वेषभावना व वर्चस्ववादी महत्त्वाकांक्षेला पराभूत करता येत नाही’, याची जाणीव पोप फ्रान्सिस यांनी मुलाखतीदरम्यान करून दिली. यापूर्वीच्या दोन महायुद्धांमधून मानवी समाजाने काहीच धडा घेतला नसल्याची खंत पोप फ्रान्सिस यांनी व्यक्त केली. या महायुद्धांमागे सत्तेची भूक व शस्त्रांच्या तस्करीतून वाढणारा संताप व दुःख यासारखे घटक कारणीभूत होते, असा दावाही त्यांनी केला.

रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यानंतर पोप फ्रान्सिस यांनी सातत्याने याबाबतचे आपले परखड विचार मांडले आहेत. रशिया-युक्रेन युद्धावर तीव्र दुःख व्यक्त करतानाच त्यात निरपराध्यांचाच बळी जातो, असे पोप फ्रान्सिस यांनी म्हटले होते. युक्रेन युद्धानंतर मानवता तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने प्रवास करीत असल्याचे सांगून सदर संघर्ष अमेरिका व नाटोच्या आक्रमकतेमुळे पेटल्याचा दावा करून त्यांनी चांगलीच खळबळ उडविली होती. त्यावर युक्रेनमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

leave a reply