इराणमध्ये मुलांच्या हत्येनंतर निदर्शनांचा नवा भडका उडाला

निदर्शनांचा नवा भडकातेहरान – इराणच्या सुरक्षादलाने केलेल्या गोळीबारात दोन अल्पवयीन मुलांचा बळी गेला असून यामध्ये नऊ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. या घटनेनंतर इराणमध्ये निदर्शनांचा नव्याने भडका उडाला. संतप्त निदर्शकांनी इराणचे माजी सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खोमेनी यांच्या घराची जाळपोळ केली. तर इराणचे विद्यमान सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांच्याविरोधात चिथावणीखोर घोषणा दिल्या. १९७९ साली इराणमध्ये इस्लामी क्रांती घडवून नवी राज्यव्यवस्था प्रस्थापित करणारे आयातुल्ला खोमेनी यांच्या घरावर हल्ला चढवून निदर्शकांनी या व्यवस्थेवरील संताप व्यक्त केल्याचे दिसत आहे.

निदर्शनांचा नवा भडकादोन दिवसांपूर्वी इराणच्या इझेह शहरात निदर्शक आणि सुरक्षा रक्षकांवर मोटारबाईकवरून आलेल्या दोघांनी बेछूट गोळीबार केल्याची घटना घडली होती. यामध्ये सात जणांचा बळी गेला असून हा एक दहशतवादी हल्ला असल्याचे इराणच्या सरकारने म्हटले होते. पण या गोळीबारात मारल्या गेलेल्या कियान पिरफलक या नऊ वर्षाच्या मुलाच्या आईने याबाबत धक्कादायक माहिती उघड केली. कियान व कुटुंबातील काही सदस्य मोटारीतून प्रवास करीत असताना सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांची मोटार अडवली. जवळच निदर्शने सुरू असल्याचे सांगून या सुरक्षाजवानांनी मोटारीचा मार्ग वळविण्याची सूचना केली. मोटार वळवताच जवानांनी या मोटारीवर बेछूट गोळीबार केल्याची हादरवून टाकणारी माहिती कियानच्या आईने दिली. इराणमधील निमसरकारी वृत्तसंस्थेने ही बातमी प्रसिद्ध केली. यामध्ये ९ वर्षाचा कियान व १४ वर्षाचा सेपेहर मघसौदी हा मुलगा देखील ठार झाला. कियान व सेपेहर या मुलांच्या मृत्यूची बातमी समोर येताच इराणमधील निदर्शने अधिकच उग्र बनली. गेल्या दोन महिन्यांपासून इराणमध्ये हिजाबसक्तीच्या विरोधात सुरू असलेली निदर्शने दडपण्यासाठी रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सनी केलेल्या कारवाईत ४०० हून अधिक जणांचा बळी गेला आहे. यामध्ये ५७ अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याची माहिती बुधवारच्या घटनेनंतर समोर आली आहे. त्यामुळे इझेह शहरातील या हल्ल्याचे पडसाद राजधानी तेहरानसह इराणच्या इतर शहरांमध्ये देखील उमटले.

निदर्शनांचा नवा भडकागुरुवारी रात्री मरकाझी प्रांतातील खोमेन शहरात निदर्शकांनी जोरदार घोषणा देत इराणचे माजी सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांच्या घरावर हल्ला चढविला व घर पेटवून दिले. या जाळपोळीनंतर निदर्शकांनी जल्लोष केला, तसेच इराणचे विद्यमान सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांचा विनाश होवो, अशा घोषणा दिल्या. निदर्शकांकडे पेट्रोल बॉम्ब असल्याचा दावा इराणची माध्यमे करीत आहेत. या घटनेनंतर इराणमधील प्रसारमाध्यमांवर कडक निर्बंध टाकण्यात आले असून इंटरनेटची सेवा देखील काही प्रमाणात खंडीत केली आहे.

१९७९ साली इराणमध्ये झालेल्या इस्लामिक क्रांतीचे संस्थापक म्हणून आयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांना ओळखले जाते. १९८९ साली खोमेनी यांच्या मृत्यूनंतर आयातुल्ला अली खामेनी यांच्याकडे इराणची सूत्रे आली. इराणसह जगभरातील शियापंथियांचे धार्मिक नेते म्हणून आयातुल्लांच्या पदाचा मोठा आदर केला जातो. इराणचे राजकीय सर्वाधिकार देखील सर्वोच्च धार्मिक नेत्यांच्या हाती असतात. या पदावरील नेत्यांचा अवमान म्हणजे ईशनिंदेसमान मानला जातो व त्यावर इराणमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली जाते.

त्यामुळे गुरुवारी खोमेनी यांच्या घरावर निदर्शकांनी चढविलेला हल्ला ही इराणमध्ये सुरू असलेल्या फार मोठ्या राजकीय व सामाजिक उलथापालथींची साक्ष देत आहे.

leave a reply