वॉशिंग्टन/किव्ह – खेर्सन शहरातून माघार घेणाऱ्या रशियाने आपले सर्व लक्ष डोन्बास क्षेत्रावर केंद्रित केल्याचे समोर येत आहे. गेल्या २४ तासांमध्ये रशियन फौजांनी डोन्बासमधील विविध भागांमध्ये शंभरहून अधिक हल्ले केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. यात हवाई व क्षेपणास्त्र हल्ल्यांसह आर्टिलरी अटॅक्सचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. दुसऱ्या बाजूला राजधानी किव्हसह ओडेसा बंदरापर्यंत केलेल्या व्यापक क्षेपणास्त्र हल्ल्यांनी युक्रेनमधील ५० टक्क्यांहून अधिक वीजपुरवठा यंत्रणा उद्ध्वस्त झाल्याचे युक्रेनच्या पंतप्रधानांनी स्पष्ट केले. उपलब्ध वीज वाचविण्यासाठी युक्रेनच्या नागरिकांनी देश सोडण्याचा पर्याय स्वीकारावा, असा सल्ला देशातील आघाडीच्या वीजकंपनीने दिला आहे.
गेल्या आठवड्यात रशियाने खेर्सन शहरामधून माघार घेत असल्याचे जाहीर केले होते. या माघारीनंतर युक्रेनच्या लष्कराने खेर्सन तसेच झॅपोरिझिआमधील हल्ल्यांची व्याप्ती वाढवून नवे भाग ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्याला काही प्रमाणात यश मिळाले असले तरी युक्रेनी सैन्याला मोठी मजल मारता आलेली नाही. तर दुसऱ्या बाजूला खेर्सनमधील माघारीनंतर रशियन फौजांनी आपले लक्ष डोन्बासकडे वळविल्याचे समोर येत आहे. डोन्बासमधील बाखमत व इतर शहरे ताब्यात घेण्यासाठी रशियन लष्कराने जोरदार हल्ले सुरू केले आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यासह युक्रेनच्या संरक्षणविभागालाही रशियाच्या या हल्ल्यांची दखल घेणे भाग पडले आहे. गेल्या २४ तासांमध्ये रशियाने डोन्बासमधील पाचहून अधिक शहरांवर मोठे हल्ले केले आहेत. यात बाखमतसह ॲव्हडिव्हका शहराचा समावेश आहे. या हल्ल्यांसाठी रशियाने लढाऊ विमानांसह क्षेपणास्त्रे, रॉकेट्स, तोफा व रणगाड्यांचा वापर केल्याचे सांगण्यात येते. रशियाने जवळपास १०० हल्ले चढविल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे.
डोन्बासमधील लढाई अधिक प्रखर होत असतानाच रशियाने राजधानी किव्हसह इतर शहरांवर पुन्हा क्षेपणास्त्रांचे हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे युक्रेनमधील वीजपुरवठा व ऊर्जायंत्रणेची प्रचंड प्रमाणात हानी झाली आहे. युक्रेनची वीजपुरवठा यंत्रणा युक्रेनी लष्करासाठी सहाय्यक ठरत असल्याने ती लष्करी लक्ष्य ठरते, असा दावा रशियन संरक्षण विभागाकडून करण्यात आला. रशियाकडून सतत सुरू असणाऱ्या हल्ल्यांमुळे युक्रेनमधील एक कोटीहून अधिक नागरिकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. युक्रेनमधील ५० टक्क्यांहून अधिक वीजपुरवठा यंत्रणा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची माहिती युक्रेनच्या पंतप्रधानांनी दिली. देशातील वीज वाचविण्यासाठी युक्रेनी नागरिकांनी देश सोडण्याचा पर्याय स्वीकारावा, असा सल्ला ‘डीटीईके’ या युक्रेनमधील आघाडीच्या वीजकंपनीने दिला आहे.
दरम्यान, पुढील काळात सामरिक स्थैर्यासाठी रशिया अमेरिकेबरोबर उच्चस्तरीय चर्चेत सहभागी होऊ शकते, असे रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री सर्जेई रिव्कोव्ह यांनी सांगितले. या महिन्याच्या अखेरीस रशिया व अमेरिकेत ‘न्यू स्टार्ट’ या आण्विक कराराच्या मुद्यावर बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर रिब्कोव्ह यांचे वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरते.