‘नो मनी फॉर टेरर’चे आंतरराष्ट्रीय कार्यालय उभारून भारत दहशतवादविरोधी लढ्याचे नेतृत्त्व करणार

‘नो मनी फॉर टेरर’नवी दिल्ली – तिसऱ्या ‘नो मनी फॉर टेरर’ परिषदेचा समारोप करताना भारताने आपल्या देशात या संघटनेचे आंतरराष्ट्रीय सचिवालय उभारण्याचे संकेत दिले आहेत. या परिषदेत ‘फायनॅन्शिअल ॲक्शन टास्क फोर्स-एफएटीएफ’ने भारत यासाठी घेत असलेल्या पुढाकाराचे स्वागत करून त्याला सहकार्य करण्याचे मान्य केले आहे. यामुळे दहशतवादाच्या विरोधातील जागतिक लढ्यात भारत महत्त्वाची भूमिका पार पाडणार असल्याचे दिसते.

नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या ‘नो मनी फॉर टेरर’ परिषदेचा समारोप करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्वच देशांना दहशतवादाच्या विरोधात कठोर भूमिका स्वीकारण्याचे आवाहन केले. ‘दहशतवादाच्या विरोधातील लढ्यात भारताला फार मोठे यश मिळाले असून देशाने दहशतवाद अजिबात खपवून न घेण्याचे आक्रमक धोरण स्वीकारलेले आहे. यासाठी दहशतवादाच्या विरोधात कठोर कायदे व सुरक्षा यंत्रणांना अधिक अधिकार देण्याच्या धोरणांमुळे भारतातील दहशतवाद्यांच्या कारवायांमध्ये मोठी घट झाली. त्याचवेेळी दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्यांना कठोर शासन करण्याच्या धोरणाचा परिणाम भारतात दिसू लागला आहे’, असे केंद्रीय गृहमंत्री यावेळी म्हणाले.

‘दहशतवाद हा दहशवादच असतो. त्याचे कुठल्याही प्रकारे समर्थन करता येऊच शकत नाही. म्हणूनच राजकीय मतभेद बाजूला सारून सर्वांनी, सर्वच ठिकाणी, सर्व प्रकारच्या परिस्थितीत दहशतवादाच्या विरोधात लढलेच पाहिजे’, अशी अपेक्षा परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी या परिषदेत व्यक्त केली. दहशतवादविरोधी लढ्यातून भारत कधीही माघार घेणार नाही की याच्याशी तडजोड करणार नाही, हा देशाचा निर्धार यावेळी परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केला. तसेच दहशतवादी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू लागल्यामुळे त्यांच्यापासून असलेले धोका अधिकच वाढलेला आहे, याकडेही परराष्ट्रमंत्र्यांनी लक्ष वेधले.

वाईट माणसे जागतिक पातळीवर विचार करून एकजुटीने निर्णय घेतात आणि दुर्दैवाने चांगली मंडळी केवळ आपल्या देशापुरता संकुचित विचार करतात, असा टोला लगावून परराष्ट्रमंत्र्यांनी दहशतवादाच्या समस्येकडे दुर्लक्ष करणाऱ्या देशांना टोला लगावला. हे टाळून साऱ्या जगाने दहशतवादाच्या विरोधात एकमुखाने आवाज उठवायला हवा, अशी मागणी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केली. दरम्यान, नवी दिल्लीत ‘नो मनी फॉर टेरर’चे सचिवालय सुरू करण्यासाठी भारताने सुरू केलेले प्रयत्न लक्षवेधी ठरत असून यामुळे दहशतवादाच्या विरोधातील जागतिक लढ्यात भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची बनेल.

leave a reply