लंडन – ‘कोणत्याही संघर्षात जेव्हा शस्त्रपुरवठा केला जातो, त्यावेळी त्याचे विपरित परिणाम होण्याचीही शक्यता असते. संघर्ष संपल्यानंतर अतिरिक्त झालेली शस्त्रे गुन्हेगारी टोळ्या किंवा दहशतवाद्यांच्या हाती पडण्याची भीती असते. युक्रेनमध्येदेखील हे घडू शकेल’, असे ब्रिटनच्या ‘नॅशनल क्राईम एजन्सी’चे प्रमुख ग्रॅमी बिगर यांनी बजावले. शनिवारीच ब्रिटनने युक्रेनला सहा कोटी डॉलर्सच्या लष्करी सहाय्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर हा इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.
अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय समुदायाने युक्रेनला आतापर्यंत जवळपास 25 अब्ज डॉलर्सहून अधिक मूल्याची शस्त्रे पुरविली आहेत. यात हवाईसुरक्षा यंत्रणेसह, छोट्या पल्ल्याची क्षेपणास्त्रे, रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे, दीर्घ पल्ल्याच्या रॉकेट सिस्टिम्स, सशस्त्र वाहने, रडार, मशिनगन्स, प्रगत रायफल्स, रणगाडे, तोफा, मॉर्टर्स तसेच प्रचंड प्रमाणातील ‘ॲम्युनिशन’चा समावेश आहे. रशियाच्या दाव्यानुसार यातील अब्जावधी डॉलर्सची शस्त्रे तस्करीच्या सहाय्याने परदेशी गुन्हेगारी टोळ्या व इतरांच्या हाती पडली आहेत. अमेरिकेच्या संरक्षण विभागानेही युक्रेनमध्ये पाठविण्यात येणारा शस्त्रसाठा तस्करीच्या सहाय्याने बाहेर जात असल्याच्या वृत्तावर चिंता व्यक्त केली होती. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने शस्त्रांवर लक्ष ठेवण्यासाठी एक विशेष पथकही युक्रेनमध्ये तैनात केल्याचे समोर आले होते.