कुठलाही समाजगट मागे राहणार नाही अशारितीने भारताचा उदय होत आहे

उपराष्ट्रपती जगदीप धनखड

दोहा – कुठलाही समाजगट मागे राहू शकणार नाही, अशारितीने भारताचा उदय होत आहे. भारताच्या या विकास यात्रेत कुणीही अडथळा आणू शकत नाही, असा विश्वास उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केला. फिफा वर्ल्डकपच्या उद्घाटनासाठी कतारच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या उपराष्ट्रपतींनी इथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधताना हा संदेश दिला. कतारमध्ये राहणारे लाखो भारतीय वास्तव्य करून आहेत. त्यांच्यामुळे भारत आणि कतारमधील संबंध अधिकच भक्कम बनले आहेत. प्रत्येक भारतीय देशाच्या विकासात हातभार लावत असून देशाला जगभरात पसरलेल्या या प्रवासी भारतीयांचा अतिशय अभिमान वाटत आहे. हे परदेशस्थ भारतीय म्हणजे देशाचे राजदूतच ठरतात, असा विश्वास उपराष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केला. तसेच उपराष्ट्रपती धनखड यांनी कतारमधील पायाभूत सुविधांची प्रशंसा केली व यासाठी कतारच्या नेतृत्त्वाचे अभिनंदन केले.

India is emerging in such a way that no social groupया पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भारतीयांनी दिलेल्या योगदानाचीही उपराष्ट्रपतींची आठवण करून दिली. या क्षेत्रात सुमारे आठ लाख भारतीय कार्यरत आहेत, याकडेही उपराष्ट्रपतींनी लक्ष वेधले. दरम्यान, आपल्या या कतार दौऱ्यात उपराष्ट्रपती धनखड यांनी इतर देशांच्या नेत्यांशी भेट घेऊन चर्चा केली. संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँथनी गुतेरस यांच्याशीही उपराष्ट्रपती धनखड यांची चर्चा पार पडली.

भारत व कतारचे उत्तम संबंध असून अनेक क्षेत्रात दोन्ही देश परस्परांना मोलाचे सहकार्य करीत असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. यामध्ये व्यापार, गुंतवणूक, ऊर्जासुरक्षा, संरक्षण, आरोग्य तसेच सांस्कृतिक व शिक्षणविषयक सहकार्याचा समावेश आहे. विशेषतः भारताच्या ऊर्जासुरक्षेत कतारचा फार मोठा वाटा असल्याचा दावा परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. भारत दरवर्षी कतारकडून मोठ्या प्रमाणात नैसर्गिक इंधनवायूची आयात करतो. त्याचवेळी कतारसह इतर आखाती देशांच्या अन्नसुरक्षेसाठी भारत अतिशय महत्त्वाचे सहकार्य करीत आलेला आहे, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली. पुढच्या वर्षी भारत कतारच्या राजनैतिक संबंधांना 50 वर्षे पूर्ण होणार आहेत.

leave a reply