अंकारा – रशिया व अमेरिकेने दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून तुर्कीने इराक, सिरियातील कुर्दांविरोधात कारवाई सुरू ठेवली आहे. गेल्या दोन दिवसात पीकेके आणि वायपीजीच्या २२ दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा तुर्कीने केला. अमेरिका व युरोपिय देश तुर्कीचे हल्ले रोखण्यात अपयशी ठरत असल्याचा ठपका ठेवून कुर्दांनी ‘आयएस’विरोधी कारवाईतून माघार घेतली आहे. कुर्दांच्या या निर्णयामुळे इराक व सिरियातील आयएसविरोधी कारवाईवर मोठा परिणाम होईल आणि आयएसचे दहशतवादी पुन्हा डोके वर काढतील, अशी भीती व्यक्त केली जाते.
इस्तंबूलमध्ये झालेल्या कारबॉम्बस्फोटासाठी इराक व सिरियातील कुर्द संघटनांना जबाबदार धरून तुर्कीने लष्करी मोहीम छेडली आहे. तुर्कीतील पीकेके तर सिरियातील वायपीजी या कुर्द संघटनांना एर्दोगन यांनी दहशतवादी घोषित केले आहे. तसेच त्यांच्यावरील कारवाई योग्यच असल्याचे सांगून तुर्कीने लवकरच सिरियात लष्कर घुसविण्याची घोषणा केली होती. तुर्कीचे लष्कर, चिलखती वाहने सिरियाच्या सीमेजवळ दाखल झाले असून लवकरच सिरियात मोठी कारवाई सुरू होईल, असा दावा केला जातो.
कुर्द संघटनांनी इस्तंबूलमधील स्फोटात आपला सहभाग नसल्याचे जाहीर केले आहे. तसेच एर्दोगन यांच्या सरकारने या स्फोटाची स्वतंत्र चौकशी करावी आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी या चौकशीत सामील व्हावे, असे आवाहन कुर्द संघटनांनी केले होते. अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने तुर्कीचे हल्ले रोखण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी कुर्दांनी केली होती. पण गेल्या आठवड्याभरात बायडेन प्रशासनाने तुर्कीच्या कारवायांवर टीका करण्यापलिकडे कुर्दांच्या मागणीवर प्रतिक्रिया दिलेली नाही.
यामुळे संतापलेल्या कुर्द संघटनांनी गेल्या सहा वर्षांपासून सिरियात सुरू असलेली ‘आयएस’ विरोधी कारवाई रोखण्याचे जाहीर केले. अमेरिका व युरोपिय देशांना आयएसविरोधातील कारवाई महत्त्वाचे योगदान देणाऱ्या कुर्दांचा हा निर्णय येत्या काळात मोठ्या संकटाला आमंत्रण देणारा ठरेल, असा इशारा पाश्चिमात्य विश्लेषक देत आहेत. तुर्कीच्या सिरियातील दिशाहीन हल्ले कुर्दांच्या ताब्यात असलेल्या आयएसच्या तुरुंगावर झाले तर हजारो दहशतवादी फरार होतील व आखाती देशांबरोबर पाश्चिमात्य देशांना असलेला धोका वाढेल, असे हे विश्लेषक बजावू लागले आहेत.