तैपेई – तैवानमध्ये महापौरपदाच्या निवडणूकीत राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांच्या पक्षाचा दणदणीत पराभव झाला. याची जबाबदारी स्वीकारून राष्ट्राध्यक्षा त्साई यांनी पक्षप्रमुखपदाचा राजीनामा दिला. स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चीनविरोधी भूमिकेला अधिक महत्त्व दिल्यामुळे त्साई यांचा हा पराभव झाल्याचा दावा केला जातो. दरम्यान, त्साई यांच्या पक्षाला मिळालेल्या या पराभवाचे चीनने स्वागत केले आहे.
शनिवारी तैवानसह २१ शहरांमध्ये महापौरपदाच्या निवडणूका पार पडल्या. रविवारी जाहीर झालेल्या निकालात २१ पैकी पाच जागांवरच राष्ट्राध्यक्षा त्साई यांची ‘डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी-डिपीपी’ विजय मिळवू शकली आहे. तर चीनशी जुळवून घेणाऱ्या ‘कुओमिंतांग’ या पक्षाचा विजय झाला आहे. गेल्या काही स्थानिक निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्षा त्साई यांच्या पक्षाला पराभवाचा सामना करावा लागत आहे. २०२४ साली तैवानमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यासाठी डिपीपी अधिक जोमाने जनतेसाठी काम करील, असा विश्वास राष्ट्राध्यक्षा त्साई यांनी व्यक्त केला.
दरम्यान, डिपीपी हा तैवानमधील चीनविरोधी पक्ष म्हणून ओळखला जातो. डिपीपीची तैवानवरील सत्ता चीनला कायम आव्हान देत आली आहे. त्यामुळे स्थानिक निवडणुकीतील डिपीपीचा पराभव चीनला सुखावणारा ठरत आहे.