‘झीरो कोविड पॉलिसी’ शिथिल केल्यास चीनमधील २० लाखांहून अधिक जणांचा कोरोनाच्या साथीत बळी जाईल

- चिनी संशोधक व ब्रिटीश अभ्यासगटाचा दावा

बीजिंग – चिनी जनतेत झालेल्या असंतोषाच्या उद्रेकानंतर सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने कोरोनाविरोधात राबविलेली ‘झीरो कोविड पॉलिसी’ शिथिल करण्याचे संकेत दिले होते. गेल्या दोन दिवसांपासून राजधानी बीजिंग व ग्वांगझोऊसह अनेक शहरांमध्ये त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. कालांतराने पूर्ण देशभरात याचा वापर करून पुढील वर्षात सर्व व्यवहार खुले करण्याचे संकेत चीनमधील सूत्रांनी दिले आहेत. ‘झीरो कोविड पॉलिसी’ पूर्णपणे शिथिल केल्यास चीनमधील २० लाखांहून अधिक जण कोरोना साथीत दगावू शकतात, असा इशारा चिनी संशोधक तसेच ब्रिटीश अभ्यासगटाने दिला.

चीनच्या ग्वांगशी प्रांतात ‘सेंटर फॉर डिसिज कंट्रोल’चे प्रमुख असणाऱ्या झोऊ जिआतोंग यांचा, ‘शांघाय जर्नल ऑफ प्रिव्हेन्टिव्ह मेडिसिन’मध्ये लेख प्रसिद्ध झाला आहे. या लेखात त्यांनी चीनमध्ये कोरोनाविरोधातील निर्बंध शिथिल केल्यास २० लाख जणांचा बळी जाऊ शकतो, असे बजावले आहे. चीनमधील कोरोनाचा संसर्ग होणाऱ्यांची संख्या तब्बल २३ कोटींपर्यंत जाईल, असेही जिआतोंग यांनी म्हटले आहे. लसीकरणाचा मंद वेग व ‘हर्ड इम्युनिटी’चा अभाव हे घटक त्यासाठी कारणीभूत ठरतील, याची जाणीवही चिनी संशोधकांनी करून दिली.

चिनी संशोधकांच्या या दाव्याला ब्रिटीश अभ्यासगटानेही दुजोरा दिला. ‘एअरफिनिटी’ या गटाने चीनमधील कोरोनासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात कोरोना निर्बंध शिथिल केल्यास चीनमधील १३ ते २१ लाख नागरिक दगावतील, असे सांगण्यात आले. या वर्षाच्या सुरुवातीला हाँगकाँगमधील निर्बंध शिथिल केल्यानंतर कोरोना साथीचा उद्रेक झाला होता. त्या आधारावर ब्रिटीश अभ्यासगटाने आपला अहवाल तयार केला आहे. यापूर्वी मे महिन्यात अमेरिका व चीनच्या संशोधकांनी ‘नेचर मेडिसिन’ या संशोधनपर जर्नलमध्ये लिहिलेल्या लेखात, ‘झीरो कोविड पॉलिसी’ पूर्णपणे शिथिल केल्यास १५ लाख जणांचे बळी जाऊ शकतात, असे बजावण्यात आले होते.

सध्या चीनमध्ये दररोज ३० हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. शुक्रवारपर्यंत देण्यात आलेल्या माहितीनुसार, चीनमधील कोरोना रुग्णांची आकडेवारी तीन लाख, ३१ हजार, ९५२ इतकी आहे. तर कोरोनाच्या संसर्गामुळे आतापर्यंत पाच हजार, २३३ जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी लक्षात घेता चिनी संशोधक तसेच पाश्चिमात्य गटांनी दिलेले इशारे लक्ष वेधून घेणारे ठरतात.

‘झीरो कोविड पॉलिसी’च्या कडक अंमलबजावणीमुळे घडलेल्या दुर्घटनांमुळे भडकलेली चिनी जनता गेल्या आठवड्यात रस्त्यावर उतरली होती. सलग पाच दिवसांहून अधिक काळ चीनच्या अनेक शहरांमध्ये निदर्शने सुरू होती. यात राजधानी बीजिंगसह, शांघाय व ग्वांगझोऊ यासारख्या आघाडीच्या शहरांचा समावेश होता. ऑनलाईन सेन्सॉरशिप व सुरक्षादलांच्या माध्यमातून उगारलेला कारवाईचा बडगाही चिनी जनतेला रोखू शकला नाही. त्यामुळे चीनच्या सत्ताधारी राजवटीत प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती. चीनच्या आजीमाजी अधिकाऱ्यांनीही नवे आंदोलन व निदर्शने अभूतपूर्व घटना असल्याची प्रतिक्रिया नोंदविली होती. या पार्श्वभूमीवर, बुधवारी चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने ‘झीरो कोविड पॉलिसी’तील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला होता.

हिंदी

leave a reply