रशियन इंधनावरील ‘प्राईस कॅप’ इंधन उत्पादक देशांसाठी चिंताजनक

ओमानच्या इंधनमंत्र्यांचा इशारा

Price capवॉशिंग्टन/मॉस्को – ‘रशियाच्या इंधनावर लादलेली दरांची मर्यादा कोणालाही आवडलेली नाही. ही मर्यादा कोणत्या स्तरापर्यंत जाऊ शकते याची काहीच कल्पना नाही. आज रशियाला लक्ष्य केले आहे. उद्या त्यात अजून बदल होतील आणि कदाचित जागतिक स्तरावरील इंधनाच्या दरांवर मर्यादा लादली जाईल. असे झाले तर ती अतिशय गंभीर बाब ठरेल’, असा इशारा ओमानचे इंधनमंत्री सलीम अल-औफि यांनी दिला. ओमान हा इंधन उत्पादक देशांची संघटना असणाऱ्या ‘ओपेक’मधील आघाडीचा देश असून आखातातील आघाडीचा तेल उत्पादक देश म्हणून ओळखण्यात येतो. त्यामुळे ओमानी मंत्र्यांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका, ब्रिटनसह युरोपातील अनेक देशांनी रशियन इंधनाची थेट आयात बंद केली आहे. मात्र यातील अनेक देश वेगवेगळ्या मार्गाने रशियन इंधनाची खरेदी करीत असल्याचे वारंवार समोर येत आहे. गेल्या आठवड्यात ‘जी7’, युरोपिय महासंघ व ऑस्ट्रेलियाने रशियाकडून निर्यात करण्यात येणाऱ्या कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 60 डॉलर्स ठेवण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रशियन तेल म्हणून ओळखण्यात येणाऱ्या ‘उरल्स क्रूड’ तेलाचे दर प्रति बॅरल 54 डॉलर्सपर्यंत खाली आले आहेत.

oman salim al aufiरशियावर लादलेल्या ‘प्राईस कॅप’मुळे इंधन बाजारपेठेला अद्याप मोठा धक्का बसलेला नसला तरी भविष्यात त्याला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल, असे संकेत ओमानच्या मंत्र्यांनी दिलेल्या इशाऱ्यातून मिळत आहेत. रशियाने आपल्यावर लादलेल्या प्राईस कॅपला विरोध करताना कच्च्या तेलाचे उत्पादन तसेच निर्यातीत घट करण्याबाबत बजावले आहे. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय विश्लेषक प्राईस कॅपचा सर्वात मोठा फटका युरोपिय देशांनाच बसणार असल्याकडे वारंवार लक्ष वेधत आहेत.

पुढील काळात चीनमधील इंधनाची मागणी वाढल्यास कच्च्या तेलाच्या दरांमध्ये मोठी वाढ होईल आणि युरोपातील इंधनटंचाई व महागाईचे संकट अधिकच तीव्र होईल, असे डेमोन्स्टेनस फ्लोरोस या इटालियन विश्लेषकांनी बजावले. ‘प्राईस कॅप’मुळे रशियाच्या उत्पन्नावर विशेष परिणाम होणार नसल्याकडेही फ्लोरोस यांनी लक्ष वेधले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून पाच लाख बॅरल्स अथवा त्याहून अधिक रशियन तेल कमी होईल, असा दावा इंधनक्षेत्रातील कंपन्या तसेच विश्लेषकांनी केला आहे. मात्र रशिया पूर्वी झालेल्या करारांप्रमाणे इतर देशांना कच्चे तेल पुरविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे रशियन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

leave a reply